चक्रीव्याज वसुलीचा व्यवसाय जोमात, मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
एका खासगी सावकाराने भाजी व्यापाऱयाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. यासंबंधी शुक्रवारी मार्केट पोलीस स्थानकात संतोष चंदनमल परमार (रा. नानावाडी) या सावकाराविरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
इरफान बशिरअहम्मद बागवान (वय 39, रा. विरभद्रनगर) या भाजी व्यापाऱयाने मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. भा.दं.वि. 384, 506 व खासगी सावकारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी पुढील तपास करीत आहेत.
इरफान यांचे मार्केटयार्डमध्ये होलसेल भाजी व्यापार आहे. आर्थिक अडचणीसाठी इरफान यांनी 2018 मध्ये चंदनमल परमार यांच्याकडून 10 लाख रुपये घेतले होते. 9 टक्के व्याजाने ही रक्कम उचलण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा 30 लाख रुपये उचलण्यात आले होते.
त्यावेळी जीवे मारण्याची धमकी देवून कोऱया बॉन्डवर सह्या घेतल्याचे इरफान यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 21 मार्च 2018 पासून दरमहा 98 हजार रुपये व्याज देण्यात आला आहे. व्यापाऱयात तोटा झाल्याने फुल्ट्रोन फायनान्समध्ये 30 लाख रुपये कर्ज काढुन 27 मे 2019 रोजी आपल्या वडिल बशीरअहम्मद बागवान यांच्या खात्यावरुन संतोष परमार यांच्या खात्यावर आरटीजीएसच्या माध्यमातून 30 लाख रुपये पाठविण्यात आले आहेत.
तरीही तुझ्याकडून अजून 60 लाख रुपये येणे आहेत. 20 लाख रुपये व्याज व 40 लाख रुपये मुद्दल दिलास तर बॉन्डपेपर देतो, असे संतोष परमार सांगत आला आहे. 14 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता संतोष परमार हा आमच्या घरी आला. त्याने आठवडय़ाभरात पैशाची परतफेड केला नाहीस तर जीवे मारण्याची धमकी दिला आहे, असे इरफान यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
खासगी सावकारांकडून पिळवणूक
यापूर्वी खागसी सावकारांकडून सर्वसामान्यांची पिळवणूक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्य सरकारने सावकारी प्रतिबंधक कायदा आणल्यानंतरही व्याज, चक्रीव्याज वसुल करण्याचा धंदा काही बंद झाला नाही. अनेक ठिकाणी तर खासगी सावकारांच्या मदतीला काही पोलीस अधिकारी धावतात. त्यामुळे सावकारांचे फावले असून त्यांचा चक्रीव्याजाचा व्यवसाय जोमात आहे.








