बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनामुळे बऱ्याच विना अनुदानित शाळांची आर्थिक परिस्थितीत बिकट आहे. अनेक शिक्षक पगाराविना काम करत आहेत. यातच विनाअनुदानित शैक्षणिक संस्थांच्या शिक्षकांना कर्नाटक शिक्षक कल्याण निधीचा आजीवन सदस्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिली आहे. शिक्षण मंत्र्यांच्या या निर्णयामुळे शिक्षकांना दिलासा मिळाला आहे.
मंगळवारी विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वय समितीच्या बैठकीस उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी, कोरोना साथीच्या आजारामुळे राज्यातील खासगी क्षेत्रातील विना अनुदानित शैक्षणिक संस्था भयानक स्थितीत पोचल्या आहेत हे सर्वश्रुत असल्याचे म्हंटले.
अशा गंभीर परिस्थितीत कर्नाटक शिक्षक कल्याण निधीकडून सहाय्य करण्यासाठी या संस्थांच्या शिक्षकांना कल्याण निधीचे आजीवन सदस्य केले जाईल. या निधीतून इतर शिक्षकांना मिळणाऱ्या सुविधादेखील त्यांना देण्यात येतील.









