एस.टी. संप मोडून काढण्यासाठी प्रशासकीय पावले?
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सलग पाचव्या दिवशी चालणाऱया एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे रत्नागिरी जिह्यात प्रवाशांचा मनस्ताप सहन करावा लागत आह़े राज्य सरकारने स्कूल बस, खासगी आराम गाडय़ा यांच्यासह सर्वच खासगी वाहनांना एस.टी. संप संपेपर्यंत टप्पा पध्दतीने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. रत्नागिरी जिह्यात नेहमीच्या वडाप प्रवासी वाहतूक करणाऱया गाडय़ांसोबत अन्य गाडय़ाही रस्त्यावर उतरल्या आहेत त्यांना संरक्षण आणि प्रोत्साहन देण्याची भूमिका परिवहन खात्याने घेतली आहे. संप मोडून काढण्यासाठी शासनाने टाकलेले हे पाऊल असल्याचे मानण्यात येत आहे.
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसिकर यांनी सांगितले की, मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली. या बैठकीत प्रवाशांची अडचण होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था उभारण्यावर सहमती झाली. सर्वच खासगी वाहतूकदारांना टप्पा पध्दतीने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी एस.टी. संप संपेपर्यंत देण्यात आली आहे. प्रत्येक एस.टी. डेपोसाठी परिवहन खात्याचा एक अधिकारी व एक पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले, नियुक्त अधिकाऱयांनी प्रवाशांचा खोळंबा होऊ नये म्हणून खासगी गाडय़ांची रचना प्रवाशांसाठी करणे सुरु केले आहे. वाहतुकीचे साधन उपलब्ध झाले नाही म्हणून खोळंबा झाल्याची तक्रार रत्नागिरी जिह्यात कोठुनही आलेली नाही. ज्या प्रवाशांना वाहतुकीसाठी टप्पा पध्दतीचे खासगी वाहन हवे असेल त्यांनी संबंधित एस.टी. डेपोमध्ये नियुक्त केलेल्या आरटीओ व पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधावा. कोणत्याही प्रवाशाची अव्यवस्था होऊ नये म्हणून आम्ही लक्ष ठेवून आहोत. संप संपेस्तोवर आम्ही ही व्यवस्था सुरु ठेवणार आहोत.
एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत़ यामध्ये कोणताही तोडगा निघत नसल्याने प्रवासी हवालदिल आहेत. 11 नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्टीनंतर शाळा व महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत, मात्र बस सुरू नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आह़े याचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागाला बसत आह़े येथे पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत़
जिह्यात एसटीच्या 4 हजार 500 फेऱयांना या संपाचा फटका बसला असून प्रतिदिन सुमारे 70 लाख रूपयांचे नुकसान होत आह़े कोरोनामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या एसटी प्रशासनाला या संपामुळे अधिक नुकसानीला समोर जावे लागत आह़े आतापर्यंत रत्नागिरीत 27 एसटीच्या कर्मचाऱयांचे निलंबन करण्यात आले आह़े यामध्ये रत्नागिरी आगारातील 18 कर्मचारी असून 9 राजापूर आगारातील आहेत़ कारवाईचा बडगा उगारला जात असतानाही एसटी कर्मचारी मागे हटण्यास तयार नसल्याचे दिसून येत आह़े
दापोली आगाराचे 27 लाखांचे नुकसान
मौजे दापोलीः गेल्या 5 दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱयांचा संप सुरूच आहे. यात दापोली आगाराला 27 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. आगारातील कर्मचारी राज्य सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याने संप लांबण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दापोली आगाराच्या सर्वच 358 फेऱया ठप्प असल्याने आगाराचे रोज सुमारे 7 लाख रूपयांचे नुकसान होत आहे. दापोली आगारात प्रशासकीय अधिकाऱयांसह 366 कर्मचारी असून प्रशासकीय अधिकारी वगळता 85 टक्के कर्मचारी संपात सहभागी असल्याचे सांगण्यात आले. शासनाने लवकरात लवकर संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी प्रवासी करत आहेत.
खेडमध्ये मनसेचा एसटी कर्मचाऱयांच्या संपाला पाठिंबा
खेडः एसटी कर्मचाऱयांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मनसेने पाठिंबा जाहीर केला. मनसे एसटी कर्मचाऱयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे स्पष्ट करत मनसेचे राज्य सरचिटणीस तथा नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी कर्मचाऱयांच्या व्यथा जाणून घेतल्या. याप्रसंगी तालुकाध्यक्ष दिनेश चाळके, उपतालुकाध्यक्ष संजय आखाडे, शहर उपाध्यक्ष गणेश बेलोसे, मनविसे जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे, तालुकाध्यक्ष प्रसाद शेटय़े, माजी जिल्हाध्यक्ष नंदू साळवी, शहर उपाध्यक्ष सिद्धेश साळवी, रहिम सहीबोले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.









