-`दत्त असुर्ले’च्या निवडणुकीकडे सहकार वर्तुळाचे लक्ष
-डी. वाय. पाटील, `शरद’साठी सोमवारपासून हालचाली
विठ्ठल बिरंजे/कोल्हापूर
अवसायनानंतर खासगी मालकीचा झालेल्या पन्हाळा तालुक्यातील दत्त असुर्ले साखर कारखान्यासह जिल्ह्यातील शरद, डी. वाय. पाटील या तीनच साखर कारखान्याची पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. या कारखान्यांची अंतिम मतदार यादी तयार असून पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. यामध्ये दालमियांना विक्री झालेल्या दत्त असुर्लेचाही समावेश असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुती सरकारच्या काळातील एका निर्णयामुळे हा पेच निर्माण झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान पुढील टप्प्यात कोल्हापूर विभागातील 9 कारखान्यांचे बिगुल वाजणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील वारणा, राजाराम, कुंभी हे तीन तर सांगली जिल्ह्यातील विश्वासराव नाईक, मोहनराव शिंदे, डॉ. पतंगराव कदम, माणगंगा, राजारामबापू, निनाईदेवी या कारखान्यांचा समावेश आहे.
सहकार मंत्र्यांच्या 1 जून 2017 च्या आदेशामुळे दत्त चा पेच
जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या रणधुमाळीत, दत्त असुर्ले हा कारखाना चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी 1 जून 2017 रोजी दिलेला आदेश आजही कायम असल्याने निवडणूक घेण्याची वेळ सहकार विभागावर आली आहे. सध्या हा कारखाना दालमियांची खासगी मालमत्ता आहे. तरीही तांत्रिक मुद्यावर हि निवडणूक लागल्याने सहकार क्षेत्राचे लक्ष या कारखान्याच्या निवडणुकीकडे लागले आहे.
प्रशासक मंडळ अस्तित्वात
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत कलम 102 (1) नुसार 18 सप्टेंबर 2006 ला प्रादेशीक साखर सहसंचालकांनी दत्त साखर कारखान अवसायनात काढला. या विरोधात माजी चेअरमन गणपतराव सरनोबत यांनी कारखाना बजाव कृती समितीची स्थापना करुन अवसायनाच्या निर्णया विरोधात लढा उभा केला. 2016 ला प्रादेशीक साखर सहसंचालक यांनी दिलेल्या निर्णया विरोधात सहकार मंत्र्यांकडे दाद मागितली. सुनावणीअंती 1 जून 2017 ला सहकार मंत्र्यांनी सरनोबत यांचे अपिल मान्य करत प्रादेशीक साखर सहसंचालकांचा तो आदेश रद्द केला. सहकार कायद्यातील कलम 19 मधित तरतुदीनुसार कारखान्याची पुनर्रचना करण्याचे निर्देश प्रादेशीक साखर सहसंचालकांना दिले. दरम्यानच्या काळात जो पर्यंत नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येत नाही तो पर्यंत संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी अशासकिय प्रधिकृत मंडळ नियुक्त करण्याचे आदेश प्रादेशीक साखर सहसंचालकांना दिले. गणपतराव सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ स्थापन केले.
निवडणूक अधिकाऱयांकडे विचारणा
ऑक्टोंबर 2019 मध्ये या कारखान्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली होती. मात्र कर्जमाफीमुळे तीन महिने पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुन्हा निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या. मंगळवारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर प्रादेशीक साखर सह संचालक कार्यालयाने दत्तचे निवडणूक निर्णय अधिकारी पन्हाळा प्रांताधिकारी, शरदचे निवडणूक अधिकारी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्याकडे विचारणा केली आहे.
कारखाना सभासद
दत्त 4227
शरद 6962
डी. वाय. 2482
दत्तचे अवसायक मंडळ
गणपतराव सरनोबत अध्यक्ष
रामचंद्र खुडे सदस्य
बाबासाहेब चौगुले —
सुरेश पाटील —-
महिपती चौगुले —
यंत्रणा तयार
निवडणूक घेण्यापूर्वी जी पूर्व तयारी करावी लागते ती केली आहे. तीन कारखान्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दुसऱया, तीसऱया टप्प्यातील 9 कारखान्यांची मतदार यादीचे काम सुरु होणार आहे. सदाशिव जाधव, प्रादेशीक साखर सहसंचालक,