सांगली प्रतिनिधी
सांगली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्याजाने पैसे देवून त्यावर अव्वाच्या सव्वा दराने व्याज वसुल करणाऱ्या खासगी महिला सावकारला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव सुवर्णा माणिक पाटील रा. महादेव मंदिराजवळ महसूल कॉलनी, शामरावनगर, सांगली असे आहे. याबाबत हरी विष्णू कदम वय ५६ रा. कुंभार खिंड गावभाग, सांगली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, खासगी सावकारीला उघाण आल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे आल्या होत्या. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी या खासगी सावकारांच्यावर कारवाई करण्यासाठी विशेष सेलची निर्मिती केली आहे. या सेलकडे या महिला सावकाराची तक्रार आली होती. या तक्रारीची शहानिशा कल्यानंतर या महिला सावकाराच्या घरावर सेलने छापा टाकून अटक केली आहे.
खासगी सावकारी सेल प्रतिबंधक विभागाने या महिला सावकाराच्या घरावर छापा टाकला त्यावेळी या महिला सावकाराने प्रथम खासगी सावकारीचा परवाना घेतला आहे. पण परवान्याचा भंग करून तिने कोरे स्वाक्षरी असणारे धनादेश तसेच कोऱ्या उसनवार पावतीवर स्वाक्षरी घेणे, कोरे बाँड घेणे, लोकांची वाहने तारण ठेवून घेणे असे प्रकार केले आहेत. ही सर्व कागदपत्रे मिळाल्यानंतर या महिला सावकाराला अटक करण्यात आली. यावेळी तिच्याकडून रोख २७ हजार २०० रुपये, माबाईल, ज्युपिटर दुचाकी, अल्टो कार, अॅक्टीव्हा दुचाकी आणि वेगवेगळ्या लोकांच्याकडून घेतलेले कोरे धनादेश तसेच उसनवार पात्या, मिळून आले आहेत, हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक आर. एफ मिरजे, मुद्दसर पाथरवट, संदीप पाटील, यांनी केली. या महिला सावकाराने सर्वाधिक व्याजाने पैसे हे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली आहे. ज्यांनी ही रक्कम दिली नाही. त्यांच्या घरावर जप्ती आणणे तसेच कोर्टात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करणे असे प्रकार केले आहेत. त्यामुळे या महिला सावकाराविरोधात ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांनी तात्काळ सांगली शहर पोलीस संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांनी केले आहे.









