वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांचा प्रस्ताव : पर्याय मार्गी लागल्यास जनतेची सुखद सोय
प्रतिनिधी / वास्को
लॉकडाऊनच्या काळात जनतेची गैरसोय टाळण्यासाठी आणि कोरोनापासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी सार्वजनिक खासगी प्रवासी बसगाडय़ा भाडेपट्टीवर घेऊन त्या चालवण्याची सरकारची तयारी असून यासंबंधी सर्वसंबंधीत तसेच शासकीय अधिकाऱयांची लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. काही बसमालकही सरकारच्या या भूमिकेला सहकार्य करण्यास तयार आहेत, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
खासगी बसचालक संघटना व गुदिन्हो यांच्यात काल सोमवारी वास्को व पणजी अशा ठिकाणी दोन बैठक झाल्या. केवळ 50 टक्के प्रवासी घेऊन बस चालवणे परवडणारे नाही असे सांगून खासगी बसवाल्यांनी बसगाडय़ा चालवण्यास नकार दर्शवला आहे.
वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी सोमवारी दुपारी दाबोळी मतदारसंघातील आपल्या नवेवाडेतील कार्यालयात वाहतूकप्रश्नी त्यांच्या खात्याशी संबंधीत अधिकाऱयांशी चर्चा केली. यावेळी वास्कोतील काही बसमालक, मोटरसायकल पायलट व वाहतुकीशी संबंधीत इतर गटांनीही त्यांच्यासमोर आपल्या अडचणी मांडल्या. काही समस्या सोडवण्याचाही प्रयत्न मंत्र्यांनी अधिकाऱयांशी चर्चा करून केला.
बससेवा सुरु करण्यासाठी सरकार प्रयत्नशील
प्रवासी बस वाहतुकीच्या प्रश्नावर प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की गोवा कोरोनापासून सुरक्षित आहे. बहुतेक व्यवसाय व सेवा सुरू झालेल्या आहेत. आता केवळ प्रवासी बसवाहतुकीचा प्रश्न आहे. लोकांना आता प्रवासी बससेवा हवी आहे. ही सेवा उलपब्ध झालेली नसल्याने म्हणावे तसे लोक रस्त्यावर दिसत नाहीत. त्यामुळे ही सेवा सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
सरकारची अट न परवडणारी
कोरोना संसर्गाच्या प्रश्नामुळे प्रवासी बस वाहतूक पन्नास टक्के प्रवाशांच्या सहभागाने सुरू करावी अशी अट सरकारने बसमालकांना घातली होती. मात्र, अशी अट बसमालकांना मान्य नाही. ही अट आर्थिकदृष्टय़ा परवडणारी नाही अशी त्यांची तक्रार आहे. मात्र, प्रवासी जादा भरून बसगाडय़ा चालवू देणेही सरकारला शक्य नाही.
सरकारने आम्हाला मदत द्यावी
पन्नास टक्के प्रवासी नियम अमलात आणायचा असल्यास सरकारनेच आम्हाला आर्थिक मदत द्यावी, आम्ही बसगाडय़ा चालवू अशी सूचना बस मालकांनी केली आहे. मात्र, सद्याच्या कठीण आर्थिक परिस्थितीत सरकारला असा आर्थिक पुरवठा करणे शक्य नाही. त्याऐवजी सरकारनेच कदंब महामंडळामार्फत खासगी बसगाडय़ा भाडेपट्टीवर घेऊन त्या चालवणे हा एक चांगला पर्याय आहे. मुख्यमंत्र्यांनीही यापूर्वी अशा पर्यायाला पसंती दिली होती. आपणही या पर्यायाबाबत विचार करत आललो आहे. काही बसमालक यापूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्यावेळी त्यांनीही अशा निर्णयाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे हा पर्याय मार्गी लागल्यास एक नवीन पध्दत उदयास येईल असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.
संबंधितांचे ऐकून घेऊन अंतिम निर्णय
खासगी बसमालकांनी सरकारला बसगाडय़ा भाडेपट्टीवर द्याव्यात, वाहतुक दर व इतर गोष्टींवर आम्ही ठरवू. बसचालक बसमालकांचाच राहिल. मात्र, वाहक सरकारचा राहील. बसगाडय़ांची देखभालही मालकच करेल असा हा प्रस्ताव असेल. तो प्रवाशांनाही सुखकर प्रवास उपलब्ध करेल. लोकांच्या हितासाठी हा प्रस्ताव आहे. याविषयी अंतिम नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात येईल. सर्व संबंधितांचे म्हणणेही ऐकून घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल असे असे मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले.
आज प्रायोगिक तत्त्वावर चालविणार बसगाडय़ा
दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर काही खासगी बसगाडय़ा आज मंगळवार 5 मे पासून चालू करण्याचे बसमालक संघटनेने ठरविले आहे. प्रवासी किती मिळतात यावरच पुढील फेऱया ठरतील. त्यानुसार टप्प्याटप्याने आणखी बसगाडय़ा सुरू करण्याचा विचार होईल, अशी माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली आहे.
टॅक्सी मोटरसायकलवर प्रवाशाला हेल्मेट सक्ती नाही
वास्कोतील मोटरसायकल टॅक्सी पायलटांनीही मंत्री गुदिन्हो यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर सहप्रवाशाला हेल्मेट परिधान करण्याची अट शिथील करण्याची मागणी केली. एकच हेल्मेट प्रत्येक प्रवाशाला देणे अशक्य असल्याने व्यवसाय करणे शक्य होणार नाही असे मंत्र्याच्या निदर्शनास आणून देताच अधिकाऱयांशी चर्चा करून मंत्री गुदिन्हो यांनी सहप्रवाशाला हेल्मेट सक्ती मोटरसायकल टॅक्सी पायलटांसाठी शिथील करण्याचे मान्य केले.









