नोडल डिलिव्हरी सेंटरला वाढता प्रतिसाद : शहरात वेळेत पार्सलची वाहतूक
प्रतिनिधी / बेळगाव
खासगी कुरिअर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी पोस्ट विभागही पार्सल डिलिव्हरी सेवेत उतरले आहे. बेळगावमध्ये वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेल्या नोडल डिलिव्हरी सेंटरला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रत्येक महिन्याला सरासरी 2500 ते 3 हजार पार्सल ग्राहकांना घरपोच पोहचविले जात आहेत. पोस्ट विभाग व पोस्टमनकडे आजही विश्वासाने पाहिले जात असल्याने पार्सल सेवेलाही पुढील काळात अजून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास पोस्ट खात्याच्या अधिकाऱयांनी व्यक्त केला.
केवळ पोस्ट, मनीऑर्डर यावर अवलंबून न राहता पोस्ट विभागाने अनेक सेवा-सुविधा सुरू केल्या आहेत. पोस्ट-पासपोर्ट सेवा केंद्र, आधार अनेबल सर्व्हिस, आधार नोंदणी केंद्र, इंडियन पोस्ट पेमेंट बँक अशा विविध सेवा पोस्ट विभाग देत आहे. याच्याच जोडीला जानेवारी 2020 मध्ये कॅम्प येथील मुख्य पोस्ट कार्यालयात नोडल डिलिव्हरी सेंटर सुरू करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कोरोनामुळे पार्सलची व्यवस्था कमी झाली होती. परंतु ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा एकदा पार्सलची संख्या वाढली आहे. त्यामुळे खासगी कुरिअर कंपन्यांच्या व्यावसायिक स्पर्धेत आता पोस्टाला नोडल डिलिव्हरी सेंटरही सहभागी झाले आहे.
अशी आहे व्यवस्था
नोडल डिलिव्हरी सेंटरसाठी स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहे. यासाठी एकूण 6 कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. लहान पार्सल असेल तर ते शहरात कार्यरत असणाऱया 30 पोस्टमनच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी पोहचविले जाते. मोठे पार्सल असेल तर ते चार चाकी वाहनातून नेण्यात येते. यासाठी एक चार चाकी वाहन नोडल डिलिव्हरी सेंटरला देण्यात आले आहे. आलेले पार्सल कमी वेळेत पोहचविण्यासाठी पोस्ट विभागाच्यावतीने प्रयत्न केले जात आहेत.
कोरोना काळातही पार्सल डिलिव्हरी
कोरोनाने रौद्र रूप धारण केले असतानाही पोस्ट कर्मचाऱयांनी आपली सेवा सुरू ठेवली होती. मोठय़ा शहरांमधून बेळगावच्या आयसीएमआर येथे अनेक पार्सल येत होती. ती वेळेत पोहचविणे गरजेचे होते. पोस्ट कर्मचाऱयांनी ही पार्सल वेळेत पोहचवून या कोरोना काळात प्रशंसनीय कार्य केले आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल 10 हजार 988 इतकी पार्सल नोडल डिलीव्हरी सेंटरच्या ग्राहकांना देण्यात आली आहेत. यातील अधिकाधिक आयसीएमआरची असल्याचे पोस्ट विभागाकडून सांगण्यात आले.
…तर ग्रामीण भागातही
नोडल डिलिव्हरी सेंटर सुरू करून जानेवारी महिन्यात एक वर्ष पूर्ण झाले. कोरोना काळातही या सेंटर उत्तम सेवा ग्राहकांना दिली आहे. सध्या शहरापुरती ही सेवा मर्यादित असली तरी ग्रामीण भागातील पार्सल वाढल्यास त्याचाही विचार करण्यात येईल, असे बेळगाव विभागाचे पोस्ट अधीक्षक एच. बी. हसबी यांनी सांगितले.









