वृत्तसंस्था/ बेंगळूर :
अंतराळक्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे इस्रो प्रमुख के. सिवान यांनी कौतुक केले आहे. खासगी कंपन्यांना आता प्रक्षेपक आणि उपग्रह निर्माण करण्यास मंजुरी मिळणार आहे. तसेच प्रक्षेपणाशी संबंधित कामांमध्ये खासगी कंपन्या सामील होऊ शकतील. इस्रोच्या मोहिमांमध्ये त्यांना समाविष्ट करता येणार आहे. या निर्णयामुळे भारतीय अंतराळ क्षेत्र मजबूत होण्यासह देशाच्या आर्थिक प्रगतीतही मोठी मदत होणार असल्याचे सिवान म्हणाले.
केंद्र सरकारने भारतीय अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एक नवी संस्था निर्माण केली जाणार असून त्याला इंडियन नॅशनल स्पेस, प्रमोशन अँड ऑथरायजेशन सेंटर नाव दिले जाणार आहे.
इस्रोवर प्रभाव नाही
भारतीय अंतराळक्षेत्रात झालेल्या या सुधारणामुळे इस्रोवर कुठलाच प्रभाव पडणार नाही. आम्ही पूर्वीप्रमाणेच संशोधन आणि विकास, अन्य ग्रहांवर अंतराळयान पाठविणे आणि मानवी मोहिमा सुरूच ठेवणार आहोत. अंतराळ क्षेत्रातील सरकारच्या सुधारणांचा प्रभाव देशावर दीर्घकाळापर्यंत दिसुन येणार आहे. अंतराळ क्षेत्रात खासगी कंपन्यांसाठी उत्तम यंत्रणा अस्तित्वात असणाऱया देशांमध्ये भारत सामील होणार असल्याचे सिवान म्हणाले.









