15-16 रोजी संप ः सलग चार दिवस कामकाज राहणार बंद
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात बँकांनी संपाचा इशारा दिला आहे. हा संप 15 आणि 16 मार्च रोजी होणार असल्याने या संपामुळे शनिवारपासून बँका सलग चार दिवस बंद राहू शकतात. 15 आणि 16 मार्च रोजी सोमवार आणि मंगळवार आहे. तत्पूर्वी 13 मार्चला दुसरा शनिवार आणि 14 मार्चला रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. सलग चार दिवस बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांना येत्या दोन दिवसातच बँकविषयक कामे उरकून घ्यावी लागणार आहेत. तसेच एटीएममध्येही रोकड टंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
2021 च्या अर्थसंकल्पात सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एक विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला होता. सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. त्यानंतर त्यांची संख्या 10 वर जाऊ शकते. या निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱयांच्या संघटनांनी संपाची घोषणा केली आहे.









