अभिजित कटके आणि बाला रफिक शेख यांच्यापैकी कोणता मल्ल महाराष्ट्र केसरी होणार अशी चर्चा संपूर्ण राज्यभर असताना सोमवारी मैदानात घडलेल्या घडामोडींनी दोन वेगळीच नावे पुढे आणली. नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि लातूरचा शैलेश शेळके यांच्यातच लढत होणार हे निश्चित झाले. या निश्चिती बरोबरच आणखी एक गोष्ट घडली होती, ती म्हणजे अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचाच खेळाडू महाराष्ट्र केसरी होणार यावर शिक्कामोर्तब झाले. हर्षवर्धन महाराष्ट्र केसरी झाल्याने आता काकांच्या संकुलात अखेर हुलकावणी देणारी मानाची चांदीची गदाही विराजमान झाली आहे. याबद्दल त्यांच्यासह दोन्ही गुणी शिष्यांचे आणि इतर यशस्वी मल्लांचेही अभिनंदन. हरिश्चंद्र बिराजदार यांचे शिष्य असलेल्या काकासाहेब पवार यांच्या तालमीने महाराष्ट्राच्या मातीतून आंतरराष्ट्रीय मल्ल घडविण्यासाठी खूपच मेहनत घेतलेली आहे. जागतिक कांस्य, राष्ट्रकुल सुवर्णपदक, एशियन चॅम्पियनशिप, वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदके, इतर मानाच्या स्पर्धेत पदके मिळवून नऊ वर्षात तालमीने मोठे नाव पटकावले. पण, गेली पाच वर्षे महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी त्यांची झुंज अधुरी रहात होती. कधी पंचांचे निर्णय चुकायचे तर कधी खेळाडूंकडून स्पर्धेवर बहिष्कार टाकला जायचा. या तणावाला अखेर माती चारली गेली आहे. आता महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याची आणि खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिक पदक मिळवून देणारा मराठी मल्ल देण्याची जबाबदारीही या तालमीच्या खांद्यावर येऊन पडली आहे. अर्थात महाराष्ट्रातील सर्वच तालमींकडून ही अपेक्षा असली तरीही, हरिश्चंद्र बिराजदार आयुष्यभर जे ध्येय मराठी मल्लांना देत आले ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आणि ऑलिम्पिकच्या पदकाचेच होते. त्यांच्या शिष्यांवर आता गुरूचे स्वप्न साकारण्याची अधिक जबाबदारी आली आहे. नवा महाराष्ट्र पेसरी हर्षवर्धन सदगीर याच्यासह उपमहाराष्ट्र केसरी शैलेश कडूनही महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहेत. आंतराराष्ट्रीय यशासाठी हर्षवर्धनला मॅटचा मोठा अनुभव आहे. दोन सुवर्ण पदकांसह ग्रीको रोमन कुस्तीवरचे प्रभुत्व ही त्याची जमेची बाजू आहे. शैलेश कॅडेट गटातील आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. ज्युनियर राष्ट्रीय सुवर्णपदक, गतवर्षीचा ग्रीको रोमनचा विजेता आणि काही क्षणांमध्ये कुस्ती फिरविण्याची क्षमता, सकारात्मक कुस्ती हे दोघांचे वैशिष्टय़ आहे. काकांच्या संकुलातले दोनशे मल्ल चमकत आहेत. प्रत्येक वर्षी खुल्या गटात सहा ते सात खेळाडू त्यांचे असतात. यावेळच्या स्पर्धांमध्ये खेळलेल्या त्यांच्या 40 खेळाडूंपैकी 22 जणांनी पदके पटकावली आहेत. वजन गटात दहा सुवर्ण, सात रौप्य आणि पाच कांस्य पदकांसह महाराष्ट्र केसरी आणि उपमहाराष्ट्र केसरीही एकाच तालमीचा आहे. काकांनी आपली जिद्द खरी करून दाखवल्याचेच हे प्रतीक आहे. सर्वसामान्य कुटुंबातील मुले कुस्तीत जिद्द पणाला लावत आहेत. त्यांच्या बरोबरच त्यांच्या पालकांची जिद्दही कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र केसरी हर्षवर्धनची आई शेती करते आणि वडील प्रयोगशाळा साहाय्यकाची नोकरी करतात. तीच स्थिती लातूरच्या शैलेशचीही आहे. 74 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावणाऱया आणि आशियायी कनिष्ठ स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱया कोल्हापूर जिल्हय़ातील करवीर तालुक्याच्या विजय पाटीलचे वडील बाजीराव पाटील गवंडी काम करतात. पण, आपल्या मुलाने ऑलिम्पिकचे पदक पटकवावे ही त्यांची जिद्द आहे. त्यासाठी ते पडेल ते कष्ट करायला तयार आहेत. सोलापूरसारख्या जिल्हय़ातील दुष्काळी पट्टय़ातील खेळाडूंनी गतवर्षीही आपला दबदबा निर्माण केला होता. यावर्षीही माती विभागाचे 190 गुणांसह विजेतेपद, गादी विभागात 173 गुणांसह सांघिक विजेतेपद पटकावले. पुणे उपविजेता ठरला. कोल्हापूरनेही मोठे यश मिळवले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कुस्तीत नवी मुले येत आहेत. या मुलांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके जिंकण्याची कुवत आहे. ही महाराष्ट्राची ताकद आहे. अशाच स्पर्धांतून नवे पदक विजेते घडतील असे म्हटले आहे. ते खरेच आहे. गरीब आणि होतकरू मल्लांना प्रायोजक मिळवून देण्याचे काम शरद पवार यांनी नेहमीच केले आहे. महाराष्ट्रातील मल्लांवर अन्याय झाला तेव्हा ते पाठीशी राहिले. राहुल आवारेच्या बाबतीत ते पाठीशी होते म्हणूनच मोठी कारवाई टळली. कुस्तीवर आजही उत्तर भारताचे प्राबल्य आहे. ते मोडायचे तर राष्ट्रीय स्तरावर आपले मल्ल गेल्याशिवाय आता पर्याय नाही. त्यामुळे राज्य शासनानेही जिल्हावार पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, तरच राज्यात चांगले मल्ल तयार होतील. महाराष्ट्र केसरी हा एक टप्पा आहे. त्याच्यापुढच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणे आणि ऑलिम्पिकला पदक मिळवणे हेच मराठी मल्लांचे ध्येय असले पाहिजे, असे हरिश्चंद बिराजदार आयुष्यभर सांगत होते. मात्र दुर्दैवाने आमची मुले गुणवत्ता असूनही मागे राहतात. स्थानिक स्पर्धांमध्ये बक्षिसाच्या मागे लागून आपले करिअर धोक्यात घालतात. खायची आबाळ असल्याने डोपिंगला बळी पडतात. विजयाने पैसे उभे राहतात पण, आयुष्य उद्ध्वस्त होते. काका पवार आपल्या खेळाडूंना नवे ध्येय दाखवतात. स्वतः रेल्वेत वरिष्ठ पदावर असल्याने खेळाडूंनाही त्यादृष्टीने घडवतात. खेळावर लक्ष केंद्रीत करायला लावतात. गुरुविषयीचा आदर म्हणूनच निर्माण होतो. त्यामुळेच आदल्या दिवशी शैलेशने काकांना डोक्यावर घेऊन मैदानात मिरवले आणि महाराष्ट्र केसरी झाल्यावर हर्षवर्धनने उपविजेत्या शैलेशला डोक्यावर घेऊन मैदानाची फेरी काढली. दोस्ती आणि कुस्ती बरोबरच दोघांनी गुरूचाही मान ठेवला. कुस्तीही शोभेशी झाली. हल्ली हे चित्र दुर्मिळच. काका पवार त्या मुलांचे पप्पा बनलेत. बंधू गोविंद पवार, पुतणे शरद, कोच रणवीर पेंगल, शासकीय प्रशिक्षक शिवाजी कोळी यांनी ही वृत्ती खेळाडूंमध्ये जिवंत ठेवली आहे. आता या तालमीने पूर्वीच्या कथित अन्यायाचा बाऊ न करता यशासाठी झेपावावे, खाशाबांचे वारस घडवावेत हीच हरिश्चंद्र बिराजदार यांना काकासाहेब पवारांची गुरूदक्षिणा ठरावी अशा तरूण भारत परिवाराच्या शुभेच्छा आहेत.
Previous Articleज्ञानसागरातील शिंपले
Next Article पाटणे फाटा येथे मोटरसायकल अपघातात एक ठार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








