महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला छेद देत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक लढवली गेली. ‘एका निकालातच मात देणार’ असा आव आणत नेत्यांनी कोरोनाचे नियमही धुडकावले, हे अत्यंत वाईट झाले.
देशातील चार राज्यांच्या निवडणुकांबद्दलच्या महाराष्ट्रामध्ये मोठय़ा प्रमाणात चिंता व्यक्त होत होती. तेथे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक काळ सुरू झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राची फेरनिवडणूक असावी अशा पद्धतीने नेते वागले. भल्या पहाटे एकत्र येऊन शपथ घेतलेले दोन नेते देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकांच्या समोर उभे ठाकले. ते वाचले जात असताना शनिवारी तिथली जनता आपला भावी लोकप्रतिनिधी निवडणार आहे. हा एका विधानसभा मतदार संघापुरता जनतेच्या आशा आकांक्षांचा आणि आस्थेचा विषय आहे. पण त्याला महाराष्ट्राचे रणांगण बनवण्याचा प्रयत्न झाला. कोरोनात प्रचंड गर्दी जमवून सभा करण्यात आल्या. भर पावसातही सभांचे इव्हेंट झाले. एका बाजूला राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला आणि दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने निर्माण झालेली सहानुभूती अशा शक्तीचे प्रदर्शन आणि दुसऱया बाजूला परिचारक, मोहिते-पाटील अशा पारंपरिक दिग्गजांच्या बरोबरीने माढा लोकसभा मतदारसंघात मिळालेल्या यशानंतर पुढे येऊ लागलेले मराठा-ओबीसीमधील नेतृत्वाची शक्ती यांच्यातील ही खरी परीक्षा आहे. त्यात अपक्षांच्या राजकारणाचीही फोडणी आहे. हे सगळे नेते आपल्या स्थानिक प्रश्नांना कसे मांडतात आणि त्यातून ही जागा कशी खेचून आणतात किंवा राखतात हेच या निवडणुकीत दिसले पाहिजे होते. मात्र नेत्यांनी भाषणात आव असा आणला की संपूर्ण महाविकास आघाडी सरकारची शक्ती या मतदारसंघात एकवटली आहे आणि जनतेला कधी एकदा त्यांना मतदान करतो असे झाले आहे. विविध प्रकरणात सरकारला गुंतवून अडचणीत आणणाऱया विरोधी पक्षाला जनता या मतदानातून शिक्षा करणार आहे तर दुसऱया बाजूनेसुद्धा तसेच. या सरकारला महाराष्ट्रातील जनता इतकी कंटाळली आहे की, ते सगळे येऊन पंढरपूरच्या जनतेला सरकार विरोधात मतदान करा असे सांगत आहेत. हा विधानसभा मतदारसंघ एकदा जनतेने विरोधी पक्षाच्या पारडय़ात टाकला की महाराष्ट्रात लागलीच सत्तांतर घडणारच आहे! नेत्यांनी जनतेला किती गृहीत धरावे किंवा मूळ मुद्याला कसे टाळावे याचा धरबंद राहिला नाही. महामारीत निवडणूक आयोगाने इथली पोटनिवडणूक लावण्यासाठी इतकी घाई का केली? कोरोनाच्या पहिल्या लाटेत पंढरपूरची अवस्था काय होती हे माहीत असताना घेतलेला हा निर्णय, सभांना झालेली प्रचंड गर्दी, कोरोनाचे तोडलेले नियम या सर्वामुळे राजकीय नेत्यांइतकेच निवडणूक आयोगसुद्धा दोषी आहे. मात्र या सर्व दिग्गजांना आपल्या कृतीबद्दल जराही खंत वाटली नाही हे त्याहून दुर्दैवी.
महाराष्ट्रात गेल्या सोळा महिन्यांमध्ये विधान परिषदेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची मोठी पिछेहाट झाली. विधानपरिषदेला तर नागपूर आणि पुण्यासारखे हक्काचे मतदारसुद्धा विरोधात गेले. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांमध्येही फटके बसले. सांगली आणि जळगाव महापालिकेची सत्ता भाजपच्या हातून निसटली. याचा अर्थ स्पष्ट होता की राज्यात ज्यांची सत्ता आहे त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वरचष्मा राहतो. बऱयाच लोकांचे मन परिवर्तन होते. त्यांना पुन्हा नव्या सत्ता पक्षात उडय़ा माराव्या वाटतात. पण हे सर्वच ठिकाणी घडते असे नाही. एखाद दुसऱया ठिकाणी काठावर बसलेली मंडळी किंवा काही निमित्ताने दुखावलेली मंडळी ही संधी साधून पक्ष सोडतात. याचा अर्थ सत्ताधारी पक्षासाठी संपूर्ण महाराष्ट्र मोकळा झाला आहे आणि आता ते जिथे हात घालतील तिथे त्यांना यश मिळणारच असे होत नाही. दोन्ही बाजूंनी पक्षाचा विचार आयुष्यभर जपणारी मंडळीही असतात. म्हणूनच वेगवेगळय़ा ठिकाणी वेगवेगळय़ा पक्षांचे बालेकिल्ले घडतात. कधी कधी ते बालेकिल्ले सुद्धा ढासळतात. याचा अर्थ त्या पक्षाची तिथली पकड ढिली झाली असे होते, पूर्णतः सुटली असे होत नाही. त्याला तात्कालिक कारणे आणि परिस्थिती नक्कीच प्रभावित करते. पण महाराष्ट्रात दीडच वर्षात होणारी विधानसभेच्या एका मतदारसंघाची पोटनिवडणूक म्हणजे, सत्ता दृढ झाल्याची किंवा सत्ता उलथवण्याची द्वाही फिरवण्याची संधी मानली गेली. महाराष्ट्र विधानसभेत सादर झालेले दोन अर्थसंकल्प अद्याप कार्यान्वित होऊ शकले नाहीत. त्यामुळे आपल्या मतदारांना समाधानी करायची संधी, कर्जमाफी आणि इतर काही बाबी सोडता सत्ताधाऱयांना अद्याप मिळाली नाही. त्यामुळे सरकारच्या कामाचा फार मोठा ठसा उमटवून या पोटनिवडणुकीत मत मागितले जात होते अशातला भाग नाही. विरोधी पक्षानेसुद्धा तात्कालिक चमकू मुद्यांचा गवगवा करून आपले आव्हान कायम ठेवण्यापलीकडे काही केलेले नाही.
सचिन वाझे प्रकरण आणि त्या दरम्यानच्या प्रकरणाचा फायदा घेत दोन मंत्र्यांचे झालेले राजीनामे इतक्मया बळावर विरोधी पक्षाच्या सत्ता परिवर्तनाच्या गप्पांना कितपत महत्त्व द्यायचे हा प्रश्नच आहे. अद्यापही भाजपला सत्ता उलथावता येईल इतकी सत्ताधारी पक्षाची आमदार मंडळी मिळालेली नाहीत. तशी शक्मयताही नजीकच्या भविष्यात दिसत नाही. सीबीआयच्या पोतडीतून अद्याप खूप काही महत्त्वाचे बाहेरही आले नाही. असे असताना सत्ता परिवर्तनाचे वातावरण निर्माण झाल्याचा गवगवा हा ‘निवडणूक जुमला’ ठरू शकतो. पण त्याला सत्य म्हणून या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे पाहता येणार नाही. लोकांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भालके यांना निवडून दिले म्हणजे सरकारवर विश्वास टाकला किंवा भाजपचे उमेदवार अवताडे यांना निवडून दिले म्हणजे महाराष्ट्रातील सरकारच्या विरोधात वातावरण आहे असे मानता येईल का?
महाराष्ट्रातील प्रत्येक विभागातील जनतेची भूमिका लक्षात घ्यायची झाल्यास पंढरपूरचा निकाल म्हणजे त्या सर्व जनतेच्या मनातील भावना ठरू शकत नाहीत. मात्र प्रत्येक परिस्थितीचा फायदा उचलत वातावरण निर्मिती करायची सवय राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना लागलेली असल्यामुळे सर्वसामान्य राजकारणाऐवजी कुरघोडी करण्यातच त्यांचा वेळ वाया चालला आहे. टीव्ही चॅनलच्या चर्चा मंडळात सामील होऊन रोज एका विषयावर चर्वितचर्वण करत राहणे आणि राजकारणाचा मूळ उद्देश लोकांचे कल्याण हा आहे, याचा विसर पडून आपलाच पक्ष सर्वोत्तम आहे, हे लोकांच्या माथी मारण्याचे कारस्थान म्हणजे राजकारण, अशी समजूत या नेत्यांनी करून दिली आहे. पंढरपूरच्या स्थानिक प्रश्नांवर जर या नेत्यांनी दीर्घ भाषणे केली असती तर त्यांचे राजकारण लोकांच्या हिताचे आहे असे मानता आले असते.
सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही बाजूच्या पक्षांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मात्र दोघांच्याही सत्ताकाळात पंढरपुरातील एकही साखर कारखानदार स्वतःच्या पायावर उभा राहण्याच्या पात्रतेचा झालेला नाही. कर्जात बुडालेली सर्व मंडळी दोन्ही बाजूच्या काठावर आली आहेत. लोकांची देणी दोन्ही बाजूच्या लोकांकडून यायची आहेत. आणि शेतकऱयांची देणी भागवण्याचे नाव घेत नाहीत या वास्तवाकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्राच्या धुरिणांनी पंढरपुरात लोकांच्या फसवणुकीखेरीज दुसरे काही केले नाही. अशाच पद्धतीचे राजकारण करून वेळ मारून नेणे हे जर सत्तापक्ष आणि विरोधी पक्षाचे काम असेल तर त्यांच्या असण्याला किंवा नसण्याला काय अर्थ आहे हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. नेत्यांनी लोकांना या प्रश्नापासून दूर नेत भलतीकडेच भरकटवले आणि केवळ त्यांचे मत मिळवण्याचे आपले उद्दिष्ट सफल करून घेतले असेच म्हणता येईल.
शिवराज काटकर








