ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोना संसर्गाशी सामना करण्यासाठी दिल्लीच्या ‘खालसा एड’ संस्थेकडून मोफत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज येथील सह्याद्रि अतिथीगृहात लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, आमदार इंद्रनील नाईक उपस्थित होते. कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्यांच्या मदतीसाठी दिल्लीच्या ‘खालसा एड’ संस्थेने दाखविलेल्या सामाजिक दायित्वाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संस्थेचे आभार मानले.
‘खालसा एड’ संस्थेशी समन्वय साधत राज्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन उपलब्ध करुन देण्यासाठी आमदार इंद्रनील नाईक यांनी मोलाचे काम केले. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्य जनतेसह, सामाजिक संस्था, संघटनांनी हातात हात घालून एकत्र काम करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले.