संघर्ष समितीच्यावतीने करण्यात येणार स्वागत
वार्ताहर / खारेपाटण:
सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या प्रवेशद्वारावर असलेले आणि खारेपाटण दशक्रोशातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष समितीच्या माध्यमातून मागणी करून सध्या पूर्णत्वास गेलेले कोकण रेल्वेचे चिंचवली येथील खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन अखेरीस प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10.04 वा. गणपती स्पेशल दादर सावंतवाडी पॅसेंजर ही पहिली गाडी या स्टेशनवर थांबणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने खारेपाटण रोड चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीला पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे या रेल्वेचे मोठय़ा उत्साहात संघर्ष समितीमार्फत विविध मान्यवरांच्या उपस्थित स्वागत करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीचे सचिव सूर्यकांत भालेकर यांनी सांगितले.
या स्वागत समारंभासाठी आमदार नीतेश राणे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद माजी सभापती व सदस्य बाळा जठार, पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे, संघर्ष समितीचे अध्यक्ष नासीर काझी उपस्थित राहणार आहेत.
खारेपाटण दशक्रोशीसाठी चिंचवली येथे रेल्वे स्टेशन व्हावे, अशी येथील जनतेची खूप वर्षांपासूनची मागणी होती. रेल्वे स्टेशन संघर्ष समितीमार्फत जनआंदोलन उभे करण्यात आले. या आंदोलनाची तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दखल घेऊन या स्टेशनला तात्काळ मंजुरी दिली होती. त्यानुसार हे रेल्वे स्टेशन पूर्णत्वास आले आहे.









