केंद्र सरकारला 20 मे पर्यंत कालावधी, नंतर मोठा निर्णय घेणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी होत असलेले कुस्तीपटूंचे आंदोलन सलग 15 दिवस सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय खाप पंचायतींनी घेतला आहे. रविवारी खापांची महापंचायत भरविण्यात आली होती. त्यात पाठिंब्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सिंग यांना अटक करण्यासाठी केंद्र सरकारला 15 दिवसांचा अंतिम कालावधी देण्यात आला. 20 मेच्या आत केंद्र सरकारने कुस्तीपटूंच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर मोठा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा शेतकऱ्यांचे नेते राकेश तिकैत यांनी केली. केंद्र सरकारने काहीच हालचाल केली नाही, तर 21 मे या दिवशी पुन्हा खाप महापंचायत बोलाविण्यात येईल आणि त्यात मोठा निर्णय घेण्यात येईल, असे ठरविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
खेळाडूंची समिती
हे आंदोलन खेळाडूंची समितीच चालविणार आहे. तथापि, प्रतिदिन प्रत्येक खाप संघटना आपले 11-11 लोक कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आंदोलनस्थळी पाठविणार आहे. हे लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुस्तीपटूंच्यासह असतील. हा आमच्या मुलींचा प्रश्न आहे. यात राजकारण आणता कामा नये, असे तिकैत यांनीं स्पष्ट केले. पंचायतीचा हा निर्णय कुस्तीपटू विनेश फोगट यांनी मान्य केला आहे.
आंदोलनाचा इशारा
कुस्तीपटूंच्या मागण्यांचे पर्यवसान शेतकरी आंदोलनात होण्याचा इशारा खापांच्या वतीने देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी 13 महिने आंदोलन केले होते. त्याची पुनरावृत्ती कऊ असा गर्भित इशारा तिकैत यांनी दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता कोणती पावले उचलते याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. सिंग यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाला आहे.
दिल्ली पोलीसांना सज्जतेचा आदेश
कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खाप पंचायतीने मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांना सज्ज राहण्याचा आदेश देण्यात आला. आंदोलन स्थळी 2 हजारांहून अधिक पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. येणाऱ्या लोकांच्या खासगी वाहनांना दिल्लीत प्रवेश दिला गेला. मात्र, ट्रॅक्टर आणि ट्रॉलींना मात्र प्रवेश नाकारण्यात आला. सिंघू सीमारेषेवर अर्धसैनिक दलांची नियुक्ती करण्यात आली.
अन्य सीमारेषांवरही सुरक्षा
टिकरी सीमारेषा, नांगलोई चौक, पीरागढी चौक आणि मुंडका चौक येथेही अर्धसैनिक दलांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दिल्ली पोलिसही नियुक्त करण्यात आले आहेत. दिल्लीच्या 200 पोलिसांनी गस्त घालण्यास प्रारंभ केला आहे. नवी दिल्ली क्षेत्रात सुरक्षेसाठी 1,300 हून अधिक पोलीस आणि अर्धसैनिक दलांचे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. जंतर-मंतरवर एक मोबाईल सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष आणि 13 एचडी पॅमेरे बसविण्यात आले आहेत.
पंजाबातूनही आले शेतकरी
रविवारी पंजाबमधूनही खाप पंचायतीसाठी शेतकरी जंतर-मंतरवर आले होते. टिकरी सीमारेषेवर शेतकऱ्यांसमवेत आलेल्या महिलांनी बॅरिकेड हटवून दिल्लीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांना प्रवेश दिला. त्यानंतर शेतकरी बस आणि छोट्या गाड्यांमधून जंतर-मंतरवर पोहचले.
ब्रिजभूषण सिंग यांचा व्हिडीओ
खाप महापंचायतीच्या आधी ब्रिजभूषण सिंग यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला. बच्चे गलती कर रहे है, आप मत करिये, असे आवाहन त्यांनी खाप पंचायतींना केले. माझी चौकशीं सुरु आहे. ती पूर्ण होऊन मी दोषी ठरलो, तर मी स्वत:हून आपल्याकडे येईन. आपण माझी हत्या कराल तरी ते मला मान्य असेल. मात्र, आतताईपणा कऊ नका, असेही आवाहन त्यांनी व्हिडीओत केले आहे.









