प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर शहर परिसराच्या विकासासाठी गेल्या अडीज वर्षात राज्य शासनाकडून वेळोवेळी पाठपुरावा करुन जवळपास 54 कोटी रुपयाहुन अधिक निधी मंजूर करुन आणला असल्याची माहिती आ. डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी शनिवारी राजाशिवछत्रपती चौक तसेच पारिश्वाड रस्त्यावरील बस शेल्टरचे उद्घाटन करताना दिली.
यावेळी त्या म्ह्णाल्या, खानापूर शहर परिसराचा अद्याप बराच विकास बाकी आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भुयारी गटार योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच 24 तास पाणी पुरवठा योजना आदी महत्वाची कामे देखील मंजूरीच्या अंतीम टप्यात असून ती दोन्ही कामे शहर विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असल्याने त्याच्या मंजूरीसाठी देखील सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या विकासनिधीची अधिक माहिती देताना त्या म्ह्णाल्या मंजूर झालेल्या निधीतून काही विकास कामे पुर्ण झाली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शांतीनिकेतन ते पारिश्वाड क्रॉस, पारिश्वाड क्रॉस तें रुमेवाडी क्रॉस आदी रस्त्यांची कामे 4 कोटी रुपयांच्या निधीतून पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच शहरातील काही रस्ते, मंदिर परिसरात पेव्हर्स घालणे आदी कामे एसएफसी योजनेतून मंजूर झालेल्या 3.5 कोटी रुपये निधीतून लक्ष्मीयात्रेपुर्वीच पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच शहरातील काही मंदिरांच्या आवारात पेव्हर्स बसविण्यासाठी खासदार निधीतूनही अनुदान मंजूर झाले होते. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
इतर मंजूर कामांचा अधिक तपशिल देताना त्या म्हणाल्या हायटेक बस स्थानकांसाठी 7.5 कोटी रुपये, बाल आणि महिला हॉस्पिटल इमारतीसाठी 15 कोटी रुपये, जत जांबोटी रस्त्यापैकी शहरांतर्गत रस्त्यासाठी जवळपास 4 कोटी रुपये, तसेच स्लम बोर्ड फंडातून राजर्षी शाहुनगर नाईक गल्लीतील घरांसाठी 25 कोटी रुपये, कचरा निर्मुलन योजनेसाठी 75 लाख रुपये, समाज कल्याण खात्याच्या इमारतीसाठी 70 लाख रुपये, रयत संपर्क केंद्रासाठी 50 लाख रुपये, मौलाना आझाद स्कूल इमारतीसाठी 50 लाख रुपये, हॉस्पीटल गॅसपाईपलाईनसाठी 50 लाख रुपये, सरकारी दवाखान्याच्या सुधारणेसाठी 31 लाख रुपये, वाजपय्यीनगर विद्युतीकरणासाठी 25 लाख रुपये, सरकारी माध्यमिक शाळेच्या इमारतीसाठी 28 लाख, बसथांब्यासाठी 10 लाख रुपये, तसेच शहरातील पाणी पुरवठा योजनेतील दुरुस्ती कामासाठी 50 लाख रुपयाचा निधीचा त्यामध्ये समावेश असून त्यापैकी 70 टक्के कामांची सुरुवात झाली आहें तर 30 टक्के कामे सुरु करण्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात बांधलेल्या दोन्ही बस शेल्टरचा प्रवाशांनी लाभ घ्यावा तसेच राजा शिवछत्रपती चौकातील पुर्व बाजूलाही बस शेल्टर बांधून देंण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या उद्घाटन सोहळय़ाला नगरसेवक सर्वश्री अप्पय्या कोडोळी, विनायक कलाल, मझर खानापूरी, नारायण मयेकर, नारायण ओगले, लक्ष्मी अंकलगी, लक्ष्मी पाटील, साहिरा सनदी तसेच नगरपंचायतीचे आरोग्य अधिकारी एस. आय. पाटील, मुख्यलिपीक प्रेमानंद नाईक यासह नगरपंचायतीचे कर्मचारी, तालुका भाजपचे सेक्रेटरी गुंडू तोपीनकट्टी, प्रकाश बैलूरकर, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळी, अनिता दंडगल, रवि काडगी, किरण कोडोळी, घुडूसाहब टेकडी यासह इतर नागरिक उपस्थित होते.









