रस्त्याची पुन्हा वाताहत, अनेक ठिकाणी पाण्याने भरलेले खड्डे, वाहने अडकण्याचे प्रकार, दुरुस्तीकडे दुर्लक्षच

वार्ताहर /खानापूर
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी खानापूरपासून लोंढा-रामनगर महामार्गाची पुन्हा वाताहत झाली आहे. रस्ता दुरुस्तीला मुळातच विलंब झाला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली असून खड्डे पडलेल्या ठिकाणी पाणी साचून वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक म्हणजे एक कसरतच झाली आहे. किमान यावषी तरी पावसाळय़ापूर्वी हा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होईल, अशी आशा बाळगणाऱया गुंजी, लोंढा भागातील नागरिकांना मागील वर्षापेक्षाही अधिक मोठा फटका बसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
खानापूर-रामनगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम पर्यावरणवादी व वनखात्याच्या न्यायालयीन कचाटय़ात अडकल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून रेंगाळले खरे. अखेर एक जुलै रोजी वनखात्याने या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला हिरवा कंदील दाखविला असताना प्रत्यक्षात खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आलेल्या कामगारांना वनखात्याने आंधळेपणाने रोखण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱया दिवशीच कामगारांनी पोबारा केला. त्यामुळे पडलेल्या खड्डय़ात माती टाकून रस्ता सुरळीत करण्याचा प्रयत्नही थांबला. आता जोरात पाऊस सुरू असल्याने महामार्गाच्या दुरुस्तीवेळी काढण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यात अनेक ठिकाणी तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे. मोठ-मोठे खड्डे पडल्याने वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत. मंगळवारी या ठिकाणी ओम्नी वाहन सावरगाळीनजीक पडलेल्या एका खड्डय़ात अडकून पडले. त्यामुळे वाहनधारकांना बरीच कसरत करावी लागली. बुधवारीही याच मार्गावर एक प्रवासी वाहन अडकून बसल्याने तेही काढण्यासाठी दिवसभर त्यांना प्रयत्न करावे लागले. खानापूर-रामनगर हा मार्ग गोव्याला जोडणारा असल्या कारणाने या मार्गावर मोठी वाहतूक आहे. पावसाळय़ापूर्वी अनेक अवजड वाहने या मार्गावरून ये-जा केल्यानेच अनेक मोठे खड्डे या ठिकाणी पडले.
आता या भागातील लोकांना पावसाळय़ातील दिवस कसे काढावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मंजूर झालेल्या निधीतून पडलेले खड्डे बुजवण्याचे काम संबंधित कंत्राटदार हाती घेईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. एकेरी रस्ता बऱयाच ठिकाणी पूर्ण झाला आहे. ज्या ठिकाणी पूल बांधण्याचे काम शिल्लक आहे अशा ठिकाणी पर्यायी रस्त्यावर वाहने अडकण्याचे प्रकार घडत आहेत. तात्काळ अशा अडचणीच्या ठिकाणी मंजूर झालेल्या निधीतून रस्ता दुरुस्तीसाठी संबंधित कंत्राटदारावर दबाव आणून येत्या दोन-तीन दिवसांत रस्त्याचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.









