मटकाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे सांगून 50 हजारांची मागणी : 15 हजाराची लाच घेताना अटक
प्रतिनिधी /बेळगाव
मटकाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बेळगाव येथील युवकाकडून लाच स्वीकारताना खानापूर पोलीस स्थानकातील दोन पोलीस एसीबीच्या (ऍन्टी करप्शन ब्युरो) जाळय़ात अडकले आहेत. 50 हजार रुपयांची मागणी करून 15 हजार रुपये घेताना त्यांना पकडण्यात आले आहे.
सिद्धू मोकाशी व विठ्ठल चिप्पलकट्टी या दोन पोलिसांना बुधवारी लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. एसीबीचे जिल्हा पोलीसप्रमुख बी. एस. नेमगौडा यांनी बुधवारी रात्री एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.
रामनगर, बेळगाव येथील परशराम विठ्ठल गाडीवड्डर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एसीबीचे पोलीस उपअधीक्षक जे. एम. करुणाकर शेट्टी, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, एच. सुनीलकुमार आदींनी ही कारवाई केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोन पोलिसांनी खासगी व्यक्तींना पुढे करून लाच स्वीकारली आहे.
एसीबीच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि. 17 जानेवारी रोजी रामनगर, बेळगाव येथील परशराम गाडीवड्डर हा आपला मित्र महेश शेट्टय़ाप्पा गाडीवड्डर याच्या समवेत कामानिमित्त खानापूरला गेले होते. खानापूर येथील ब्ल्यू स्टार हॉटेलजवळ हे दोघे उभे असताना पोलीस सिद्धू मोकाशी व विठ्ठल चिप्पलकट्टी हे दोघे तेथे आले.
तुम्ही मटका खेळत आहात, तुमच्यावर एफआयआर दाखल करू, असे सांगत त्यांनी मोबाईल काढून घेतला. त्यानंतर पोलीस स्थानकापर्यंत प्रकरण गेले तर 50 हजार रुपये लागतात. त्यापेक्षा 10 हजार रुपये दिलात तर मोबाईल परत करू, असे सांगितले होते. त्यामुळे परशराम गाडीवड्डर यांनी एसीबीच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली होती. बुधवारी पोलीस सिद्धू मोकाशी व विठ्ठल चिप्पलकट्टी यांच्या सांगण्यावरून गांधीनगर-खानापूर येथील सागर मारुती अष्टेकर व तौसिफ महम्मदजाफर चांदखान या दोघा जणांनी 15 हजार रुपये लाच स्वीकारली. एसीबीच्या अधिकाऱयांनी ही रक्कम जप्त केली आहे.









