खानापूर :कर्नाटक शासनाच्या गृहखात्याने राज्यातील सर्व पोलीस स्थानकांचा दर्जा उंचावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांचे रुपांतर पोलीस निरीक्षक ठाणे असे करण्यात आले आहे. खानापूर पोलीस ठाणे आता पोलीस निरीक्षक ठाणे म्हणून कार्यरत आहे.
पूर्वी मंडल पोलीस निरीक्षकांच्या देखरेखीखाली चार पोलीस ठाण्यांचा कार्यभार होता. आता नव्या रचनेनुसार या ठाण्यात निरीक्षक, उपनिरीक्षक, सहउपनिरीक्षक, हवालदार, पोलीस असे कर्मचारी आवश्यक आहेत. सध्या खानापूर पोलीस निरीक्षक कार्यालयात एक निरीक्षक व एक उपनिरीक्षक, 8 सहउपनिरीक्षक, 12 हवालदार व 28 पोलीस कामकाज पाहत आहेत. या कार्यालयाच्या व्याप्तीत खानापूरसह 161 गावे येतात. यात 18 मोठी तर 139 मध्यम व 4 लहान अशी गावे आहेत. या गावांनी 70848 चौरस मी. इतका परिसर व्यापला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 1 लाख 43 हजार 345 इतकी लोकसंख्या या निरीक्षक ठाण्याची आहे. जनगणनेनुसार व व्याप्तीनुसार खानापूर पोलीस ठाण्यात अद्याप 3 उपनिरीक्षक, 6 हवालदार, 10 पोलीस कर्मचाऱयांची कमतरता आहे. याबाबत जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालणे गरजेचे आहे.
खानापूर पोलीस निरीक्षक ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दुर्गम भाग आहे. यात चोर्लापासून हेम्माडगापर्यंतचा भाग येतो. त्यामुळे सध्या असलेल्या पोलीस कर्मचाऱयांवर कामाचा अतिताण येत आहे. त्यामुळे अनेक लोकांना पोलीस ठाण्यात आपल्या कामासाठी सतत फेऱया माराव्या लागतात. कणकुंबी-चोर्ला परिसरात होणारे अपघात व इतर गुन्हे लक्षात घेता पोलिसांना जास्तीत जास्त या भागात काम करावे लागत आहे. मंत्र्यांचे दौरे व इतर गुन्हय़ांचा तपास, त्यामुळे सतत कार्यरत वरिष्ठ अधिकाऱयांना ठाण्यात उपस्थित राहून नागरिकांना वेळ देता येत नाही. पासपोर्ट, नोकरीसाठी आवश्यक दाखले, बंदूक परवाना यासह इतर कामांसाठी सामान्य नागरिकांना येथे वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱयांनी याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.









