मतदानाचा टक्का वाढला : जनतेचा कौल मतदान पेटीत बंद
वार्ताहर / खानापूर
खानापूर नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या १३ जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले. यात मतदानाचा टक्का वाढला असून ८५.५२ टक्के इतके मतदान झाले. खानापूर नगरपंचायतच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. या निवडणुकीत १३ जागांसाठी ३९ उमेदवार जनतेचा कौल आजमावत आहेत. निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती तसेच मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान पार पडले. या ३९ उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले असून उर्वरित चार प्रभागांच्या निवडणुकीनंतर १९ जानेवारीला निकाल लागणार आहे.
खानापूर नगरपंचायतच्या १३ जागांसाठी मंगळवारी निवडणूक पार पडली. सर्वच पॅनेलच्या नेत्यांनी ही लढत प्रतिष्ठेची केल्याने सर्व कार्यकर्त्यांनी मतदारांना आणून मतदान करून घेतल्याने मतदानाचा टक्का वाढला आहे. या निवडणुकीत शिवसेना व काँग्रेसच्या महाविकास आघाडी विरोधात काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता आघाडी, आणि भाजप यामध्ये थेट लढत झाली. अत्यंत चुरशीने हे मतदान झाले असून जवळपास सर्वच प्रभागात ८५ टक्क्यांच्या दरम्यान मतदान झाले. यात प्रभाग क्र. १ मध्ये ८४.३७ टक्के, प्रभाग २ मध्ये ८४.९४, प्रभाग ३ मध्ये ९३.५५, प्रभाग ४ मध्ये ८९.६६, प्रभाग ५ मध्ये ९३.५४, प्रभाग ६ मध्ये ८६.४०, प्रभाग ७ मध्ये ८४.३०, प्रभाग ८ मध्ये ८२.५७, प्रभाग १० मध्ये ८२.३९, प्रभाग १२ मध्ये८८.४०, प्रभाग १४ मध्ये ८५.८८, प्रभाग १५ मध्ये ८५.१६, प्रभाग १७ मध्ये ७९.०२ टक्के मतदान झाले.
तसेच १३ प्रभागातील एकूण ३९५७ मतदारांपैकी ३३७४ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात सरासरी ८५. ५२ टक्के मतदान झाले. या १३ जागांसाठी ३९ उमेदवारांनी निवडणूक लढवली असून या सर्व उमेदवारांचे भवितव्य पेटीत बंद झाले आहे. या १३ जागांचा निकाल हा राहिलेल्या ४ प्रभागांचे मतदान झाल्यानंतर एकत्रित मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे.