वार्ताहर / खानापूर
स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये झालेल्या स्पर्धेत खानापूर शहराने महाराष्ट्र राज्यात अव्वल क्रमांक पटकवला. याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. शनिवारी विज्ञान भवन दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. खानापूर जनता विकास आघाडीचे नेते सुहास शिंदे, नगराध्यक्षा स्वाती राजेंद्र टिंगरे, माजी नगराध्यक्ष तुषार मंडले, मुख्याधिकारी आश्विनी पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार प्रदान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणात पुरस्कार स्वीकारल्याचे पाहून शहरातील नागरिकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. खानापूर शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच नगरपंचायतचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आल्याने शहरातील नागरिकांना अभिमान वाटत आहे.
खानापूर नगरपंचायत स्थापनेपासून स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सहभागी होत आहे. नगरपंचायतने गेल्या पाच वर्षात तीन वेळा अव्वल कामगिरी करत राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये खानापूर शहर हे स्वच्छतेच्या शर्यतीत अव्वल ठरले असून राज्यात प्रथम क्रमांक तर देशात २२ वा क्रमांक पटकावला आहे. खानापूर शहरासाठी हे यश कौतुकास्पद असून खानापूर शहराचा नावलौकिक राज्यातच नाही तर संपूर्ण देशात झाला आहे. ही बाब शहरातील नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट ठरली आहे. यापूर्वीही शहराने कचरामुक्त शहर व हागणदारी मुक्त शहर ओडिएफ + आदी नामांकने देखील मिळवली आहेत.
खानापूर नगरपंचायतच्या या यशामध्ये आघाडीचे नेते सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या नगराध्यक्षा स्वाती टिंगरे, मुख्याधिकारी आश्विनी पाटील, माजी नगराध्यक्ष तुषार मंडले, उपनगराध्यक्ष अमोल सरगर, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर, यांच्या सह सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायतचे कर्मचारी, सामाजिक संस्था, राजकीय नेते, कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यापारी सफाई कामगार, नागरिक व शाळांचे विद्यार्थी यांचे योगदान लाभले.








