बातमीदार / खानापूर
हलगा ग्रामपंचायतीच्या किरहलशी वॉर्डातील पोटनिवडणुकीत स्वाती सदानंद पाटील प्रचंड मताधिक्मयाने विजयी झाल्या आहेत. हलगा ग्रामपंचायतीच्या किरहलशी वॉर्डासाठी एक जागा होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात ही जागा ‘अ’ वर्ग महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली होती. या गावात ‘अ’ वर्गात येणारी महिला नव्हती. या जागेसाठी एकही अर्ज न आल्याने त्यावेळी सदर जागा रिक्तच राहिली होती. सोमवारी या जागेसाठीची पोटनिवडणूक झाली. यावेळी सदरची जागा ‘ब’ वर्ग महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली होती. निवडणुकीत 349 मतदारांनी सहभाग दर्शवला होता.
या निवडणुकीत स्वाती सदानंद पाटील यांना 237 मते मिळाली तर प्रतिस्पर्धी रेणुका सहदेव पाटील यांना 100 मतांवर समाधान मानावे लागले. 12 मते रद्द झाली. बुधवारी खानापूर तहसीलदार कार्यालयात मतमोजणी झाली. निवडणूक अधिकाऱयांनी स्वाती पाटील यांना विजयी झाल्याचे घोषित केले.
विजयी स्वाती पाटील यांनी खानापूर शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाला हार घालून समर्थकांसह विजयोत्सव साजरा केला. विजयी उमेदवार व सर्व समर्थकांनी आपल्या किरहलशी गावात जाऊन तेथेही फटाके वाजवून व गुलाल उधळून विजयोत्सव साजरा केला. विजयी उमेदवारासह सर्वांनीच भगवे फेटे परिधान केल्याने परिसर भगवामय झाला होता. गावच्यावतीने भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. स्वाती पाटील यांच्या विजयामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. गणेबैल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस .टी. पाटील यांच्या त्या पत्नी होत. विजयी स्वाती पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या, किरहलशी ग्रामस्थ, एकता ग्रुप, वारकरी मंडळ, युवक व महिला मंडळांनी दिलेल्या सहकार्यामुळेच विजय झाला. हा विजय माझा नसून गावातील समस्त जनतेचा आहे. गावच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदोदित प्रयत्न करणार आहे..
माळअंकलेत विजयोत्सव साजरा

इदलहोंड ग्रामपंचायतीच्या माळअंकले वॉर्डातून लक्ष्मी बाबू नाईक (सिंगीनकोप) विजयी झाल्या. माळअंकले वॉर्डातील एक जागा अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव होती. जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत या जागेसाठी गावातून एकही महिला पात्र नसल्याने सदरची जागा रिक्त राहिली होती. त्यामुळे सोमवारी या जागेसाठी पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली. लक्ष्मी बाबू नाईक (सिंगीनकोप) विरुद्ध रेणुका यल्लापुरी यांच्यात निवडणूक लागली. या निवडणुकीत लक्ष्मी नाईक यांना 367 व रेणुका यल्लापुरी यांना 157 मते मिळाली तर 7 मते बाद झाली. निवडणुकीत 531 मतदारांनी सहभाग दर्शवला होता. निवडणूक अधिकाऱयांनी लक्ष्मी नाईक यांना विजयी घोषित केले. त्यानंतर समर्थकांनी विजयोत्सव साजरा केला. इदलहोंड ग्राम. प. अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर, माजी उपाध्यक्ष सदानंद होसूरकर, सदस्य यल्लापा होसूरकर, उदय पाटील, महादेव चोपडे, बाळाराम निडगलकर, मारुती सावंत, नागेंद्र होसूरकर, सदोबा गोरल, नवनाथ होसूरकर आदींसह समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.
कक्केरीत गुलालाची उधळण

कक्केरी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत कार्तिक चंद्रशेखर अंबोजी विजयी झाले. कक्केरी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष ऍड. सी. बी. अंबोजी यांचे जानेवारी महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर निधन झाले होते. सी. बी. अंबोजी यांच्या निधनानंतर निवडणुकीचा निकाल लागला. त्या निवडणुकीत सी. बी. अंबोजी विजयी झाले होते. परंतु त्यांचे निधन झाल्याने ग्रामपंचायतीची ही जागा रिक्त राहिली
होती.
रिक्त राहिलेल्या या जागेसाठी सोमवारी मतदान झाले. बुधवारी निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत सी. बी. अंबोजी यांचे सुपुत्र कार्तिक चंद्रशेखर अंबोजी विजयी झाले. कार्तिक अंबोजी यांना 453 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्रसन्ना दोड्डेबैलकर यांना 354 मते मिळाली. तर 10 मते बाद झाली. मतदानात एकूण 817 जणांनी सहभाग दर्शवला होता.
कार्तिक अंबोजी यांच्या विजयाबद्दल त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके वाजवून विजयोत्सव साजरा केला.









