तालुक्यातील पॉझिटिव्हची सक्रिय संख्या 23 वर : प्राथमिक आरोग्य केंद्रासह ग्रामीण भागातही फैलाव
खानापूर /वार्ताहर
खानापूर तालुक्यात शनिवारी १० नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात रुग्णांची संख्या 23 वर पोहोचली असून तालुक्यात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही याचा फैलाव होताना दिसत आहे. शनिवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार खानापूर तालुक्यात दहाजण पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्ये खानापूर शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी असलेल्या एका पती-पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे अशोक नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील एका कर्मचाऱ्याला याची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील कक्केरी 1, मेरडा 2, मेंडेगाळी 1, लिंगनमठ 2 व हलशी गावात 1 अशी एकूण 10 पॉझिटिव्ह ची संख्या असून यामध्ये 6 महिला व 4 पुरूषांचा समावेश आहे खानापूर तालुक्यात हा वाढता कल लक्षात घेता आता प्रत्येकाने काळजी घेऊन स्वतःच्या आरोग्याची सुरक्षितता राखणे अत्यंत गरजेचे बनले आहे. तालुक्यात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असून तालुक्यात अद्याप 300 हून अधिक तपासणी अहवाल येणे बाकी आहे.