खानापूर / प्रतिनिधी
श्रावण मासाला प्रारंभ झाला की, सगळेच सण आनंद घेऊन सुरुवात करतात. अन् सणवाराचे उत्साही स्वागत होते. श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी. या उत्साही सणात नागदेवता, वारुळाची पूजा करून पाठीराख्या नागराजाला ओवाळणी घालताना महिला दिसतात. नागपंचमीच्या सणात सकाळपासून उपवास, दुपारी नागदेवताची पूजा केली जाते. यासाठी महिला भगिनी जवळच्या नागदेवता मंदिरात जातात. जेथे नागदेवता मंदिर नाही अशा ठिकाणी वारूळरुपी मंदिराचा शोध घेऊन त्या ठिकाणी नागदेवताच्या नावे गोड-धोड करून पूजा-अर्चा केली जाते. खानापूर तालुक्यातही नागंपचमी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. तालुक्यातील नागपंचमी उत्सवाची एक आगळी परंपरा आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात हा सण गांभीर्याने साजरा केला जातो. नागपंचमी दिवशी गावातील मूर्तिकार मातीच्या मूर्ती बनवून देतात, शहरी भागातही मातीच्या नागमूर्ती तयार करुन विकतात. तालुक्मयाच्या काही ग्रामीण भागात हा सण दोन दिवस पाळला जातो. नागपंचमीच्या काळात नवीन पोह्याचे लाडू, उपीट, शिरा, आळूच्या वडय़ा, लाहय़ा तसेच वेगवेगळे फराळाचे पदार्थ करून सण साजरा करण्याची प्रथा आहे. महिला वारुळाला जाऊन शेतवडीतील पाठीराखा बंधू म्हणून नागदेवताला दूध घालून पूजा करतात. अलीकडे नागपंचमीच्या काळात सर्प खेळवण्याच्या परंपरेला बंदी घालण्यात आल्याने नागपंचमी दिवशी नागदेवताचे दुर्मीळ दर्शन होते. तरीही या नागदेवाच्या नावे पूजा-अर्चा करून भगवान शंकराला स्मरण केले जाते.
नागपंचमीचा सण म्हणजे झोका अर्थात पाळणा खेळणे ही महिलांची खास आवड होय. ग्रामीण भागात पूर्वांपार परंपरेनुसार एका उंच झाडाला झोका बांधून त्याच्यावर अलगतपणे बसून आनंद लुटणे किंवा घरातील एका तुळीला दोरीच्या साहाय्याने पाळणा बांधून लहान मुलांना, मुलींना खेळण्याचा छंद हा या सणातील एक महत्त्वाचा भाग आहे. पण अलीकडच्या काळात तुळय़ांची घरे गेली, अंगणातील झाडेही गेली, ‘आता उंच माझा झोका कोठे ग’ म्हणण्याची वेळ आली आहे. नागपंचमीच्या या सणात युवा वर्गही विविध स्पर्धा, विटी दांडू, खेळ कबड्डी सारखे खेळ करून आनंद लुटायचे, परंतु अलीकडे मोबाईलच्या दुनियेत आजचा युवा वर्ग हरपला आहे.
माहेरवासिनी नागपंचमीनिमित्त आवर्जुन आपल्या माहेरी उपस्थित राहून आनंद लुटतात. पूर्वीप्रमाणेच आजही काही गावात झोपाळे बांधून मुलीसह महिलाही खेळताना दिसतात. पण ही परपंरा आता दुर्मीळ होत चालली आहे.
माचीगडातील सुब्रम्हण्य मंदिरात नागपंचमी उत्सव
माचीगड (ता. खानापूर) येथे असलेल्या जागृत देवस्थान श्री सुब्रम्हण्य मंदिरात यावर्षी नागपंचमी दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये पूजा अर्चा, भजन, पूजन, यासारख्या कार्यक्रमांचा समावेश असतो. पण गेली दोनवर्षे कोरोना महामारीमुळे या मंदिरातील नागपंचमी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. श्री क्षेत्र धर्मस्थळाच्या शेजारी असलेल्या कु. के. सुब्रम्हण्य देवस्थानानंतर माचीगड येथे हे देवस्थान आहे. या देवस्थानातील दर्शनामुळे सर्व संकटे नाहिशी होतात. कालसर्पदोष, पितृदोष व अन्य इतर प्रकाराचे दोष येथे कमी होतात. अशी आख्यायिका आहे. या मंदिरातील मूर्ती ही नाग स्वरुपातील असल्याने दरवर्षी नागपंचमीला तालुका आणि तालुक्याबाहेरील अनेक भाविक मोठय़ा संख्येने येथे येतात. दिवसभर पूजा अर्चा व अभिषेक असतो.
खानापुरातील नागलिंगेश्वर मंदिरातही होतो नागपंचमीचा उत्सव
निंगापूर गल्लीतील नागलिंगनगरमध्ये असलेल्या नागलिंगेश्वर मंदिरात दोन दिवस नागपंचमी उत्सव साजरा केला जातो. या निमित्त पूजा, अर्चा व दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात येते. गेल्या काहीवर्षापासून या ठिकाणी नागपंचमी दिवशी नागलिंगेश्वर देवाच्या दर्शनासाठी बरीच गर्दी होते. या ठिकाणी कार्तिकोत्सवही साजरा केला जातो.









