जनता कर्फ्युला शहरासह तालुक्यात प्रतिसाद
प्रतिनिधी / विटा
खानापूर तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा हजारी पार गेला आहे. शनिवारी खानापूर तालुक्यात एकूण ५० रूग्ण आढळले. यामधील एकट्या विटा शहराची रूग्णसंख्या २९ इतकी आहे. अपवाद वगळता तालुक्याचा सर्व भागात कोरोना बाधित आढळू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासनावर चांगलाच ताण आला आहे.
कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेवून विटा नगरपालिकेत झालेल्या बैठकीत ८ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय झाला. त्यानंतर लगेचच जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनीही जनता कर्फ्यूचे आवाहन केले. तत्पूर्वी पाच दिवस विटा बचाव कोरोना समितीने जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. या सर्व पार्श्वभूमीवर सध्या तालुक्याच्या सर्वच भागात व्यावसायिकांनी बंद पाळत जनता कर्फ्यूला चांगला प्रितसाद दिला आहे.
गेल्या काही महन्यांपासून लोकांनी बाजारपेठेत खूप गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढता राहिला. संपूर्ण तालुकाभरात कोरोनाचे रूग्ण वाढले. तालुक्यात एकूण ६५ गावे आहेत. यापैकी अपवाद वगळता बहुतांशी गावात कोरोनाने शिरकाव केला आहे.
354 कोरोनामुक्त
खानापूर तालुक्यात शनिवार अखेर कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येने हजाराचा आकडा पार केला. तालुक्यात सध्या १०१२ रूग्ण आढळून आले आहेत. यापैकी कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला. तर जवळपास ३५० हून अधिक रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सध्या ६२७ रूग्ण उपचारात आहेत.
यापैकी लक्षणे नसणारे बहुतांश रूग्ण हे कोविड केअर सेंटर आणि घरीच थांबून गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. तर विटा ग्रमीण रूग्णालय, तीन खासगी रूग्णालयासह अन्य ठिकाणी रूग्णांच्यावर उपचार सुरू आहेत. शहरासह तालुक्यातील रोजची रूग्ण संख्या पन्नाशी पार जात आहे. वाढते रूग्ण आणि अपुरी व्यवस्था यामुळे आरोग्य यंत्रणेस प्रशासनावर ताण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सुरू असणार्या जनताकर्फ्यूला तालुकाभरातून चांगला प्रितसाद मिळत आहे.
Previous Articleसांगली : तासगावात 13 तर तालुक्यात 71 कोरोना रूग्ण
Next Article कोरोनाला दुर्लक्षित करू नका, काळजी घ्या – जयंत पाटील








