नंदगड / वार्ताहर
गेल्या काही दिवसांपासून खानापूर तालुक्मयात आकाशात दिवसभर ढगाळ वातावरण व दुपारनंतर दमदार पाऊस पडत आहे. पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. पाऊस कधी पडेल याची शाश्वती नाही, असे असताना पावसाची तमा न बाळगता शेतातील भात पीक कापणी व मळणी कामात शेतकरी वर्ग गुंतला आहे.
खानापूर तालुक्मयात पावसाळय़ातील चार-पाच महिने बऱयापैकी पाऊस होतो. त्यामुळे येथील शेतकरी भात पीक घेतात. खानापूर तालुक्मयातील कापोली, हालगा, हलशी, बिडी, नंदगड, लोंढा, गुंजी, नेरसा, शिरोली, रामगुरवाडी, बरगांव, लालवाडी चापगाव, गर्लगुंजी, लोंढा, जांबोटी, कणकुंबी तसेच हेम्माडगा येथे भाताचे पीक घेण्यात येते. मध्यंतरीचे काही दिवस पावसाने ओढ दिली होती, परंतु त्यानंतर पिकाला जेवढा आवश्यक पाऊस हवा होता तेवढा पाऊस झाला. परिणामी पिकाची जोमाने वाढ झाली. त्यामुळे भात पीक बऱयापैकी आले होते. यावषी तरी आपली वर्षभराची गुजराण होईल, अशी अपेक्षा शेतकऱयात होती. परंतु तीही आशा आता पावसामुळे फोल ठरणार की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
यावषी शेतकऱयांनी मे महिन्याच्या अखेरीस व जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात भाताची पेरणी केली होती. माळरानावरील जमिनीत तीन महिन्यांत येणारे भात पीक पेरले होते. ते भात पीक सप्टेंबर महिन्यातच कापणीला आले होते. परंतु ऑक्टोंबर महिना पावसातच गेला. त्यामुळे शेतकऱयाला भाताची कापणी करणे अडचणीचे झाले. कित्येक दिवस भात कापायचे राहिल्याने ते जमिनीला टेकले होते. परिणामी बऱयाच प्रमाणात भाताचे दाणे जमिनीवर पडून नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी भाताला पुन्हा पालवी फुटली आहे. त्यामुळे दोन्हीं बाजूनी शेतकऱयांना नुकसान झाले आहे. सध्या रोज सायंकाळी थोडाफार पाऊस पडत आहे. परंतु पावसात कापलेले भात पीक भिजले तरी चालेल पण तसेच शेतात ठेवून नुकसान करण्यात काय अर्थ आहे, असे विचार शेतकरी वर्गात निर्माण झाल्याने पावसाची तमा न बाळगता शेतकरी वर्ग आता भात कापणी व मळणीच्या कामात गुंतला आहे.
सर्वांची कापणी एकाच वेळी आल्याने मजुरांची कमतरता
सर्व भागातील व गावातील सर्वांची भात कापणी एकाचवेळी आल्याने मजूर मिळणेही कठीण झाले आहे. आपल्या घरात जेवढी माणसं असतील तेवढय़ाना शेतात नेऊन भात कापणी केली जात आहे. मजुरांची कमतरता भासत असल्याने मजुरीतही वाढ झाली आहे. ज्या गावात भात पीक कमी प्रमाणात घेण्यात येते. अशा गावातील मजुरांना टेंपो, ट्रक्सद्वारे आणून त्यांच्या जाण्या-येण्याचा खर्च देऊन भात कापणी करून घेण्याचाही प्रकार घडत आहे.
ऊस तोडणीचा हंगाम सुरूच
खानापूर तालुक्मयातील उसाला चांगला उतारा असल्याने कर्नाटकासह महाराष्ट्रातील अनेक साखर कारखाने खानापूर तालुक्मयातील ऊस नेण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून खानापूर तालुक्मयाच्या विविध गावातून ऊस तोडणी सुरू आहे. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या शेतवडीतील ऊस तोडण्याचे काम सुरू आहे.
शालेय विद्यार्थी शेती कामात व्यस्त
कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वत्र शाळा व महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे बहुतांशी विद्यार्थी वर्ग आता शेतीकामात आपल्या आई-वडिलांसोबत गुंतला आहे. पालकांनाही त्यांच्या मुलांची बऱयाच प्रमाणात साथ मिळत असल्याने शेती कामात थोडीफार मदत झाली आहे.









