26 ग्रा. पं. वर महिला राज्य : ग्रामीण भागात मोर्चेबांधणीला वेग : अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीची अद्याप तारीख नाही
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्यातील 51 ग्रा. पं. च्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचे आरक्षण गुरुवारी येथील करंबळ क्रॉसवरील पाटील गार्डनमध्ये लॉटरीद्वारे जाहीर केले. आरक्षण 1993 पासून 2020 पर्यंतच्या 9 कालावधीतील अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या आलेल्या आरक्षणाला ग्राहय़ धरुन करण्यात आले. पूर्वीच्या आरक्षणानुसार आलेले अध्यक्ष-उपाध्यक्षपद याची पडताळणी करुन या पुढील कालावधीसाठी आरक्षण करण्यात आले. काही ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची लॉटरीद्वारे निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ प्रांताधिकारी अशोक तेली, तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांच्या उपस्थितीत संगणकाच्या आधारे सदर आरक्षण जाहीर करण्यात आले.
तालुक्यातील 26 ग्रा. पं. वर महिला राज्य आले आहे. 51 ग्रा. पं. पैकी दोन ग्रा. पं. वर एसटी गटाकरिता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे आरक्षण आले आहे. त्यामध्ये एक ग्रा. पं. वर महिलांसाठी आरक्षण दिले आहे. एससी गटाकरिता तीन ग्रा. पं. ची निवड करण्यात आली असून त्यामध्ये दोन ग्रा. पं. वर महिला राखीवता ठेवली आहे. ‘ब’ गटाकरिता देखील तीन ग्रा. पं. निवडण्यात आल्या असून त्यामध्ये दोन ग्रा. पं. वर महिला राखीवता ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 14 ग्रा. पं. वर ‘अ’ वर्गाकरिता आरक्षण ठेवण्यात आले असून त्यापैकी 7 ग्रा. पं. मध्ये ‘अ’ वर्ग महिलांकरिता आरक्षण ठेवण्यात आले आहे. तर उर्वरित 29 ग्रा. पं. सामान्य गटाकरिता राखीव ठेवण्यात आल्या. 14 ग्रा. पं. वर सामान्य महिलांकरिता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचे आरक्षण ठेवण्यात आले आहे.
निवड करताना गेल्या 9 वेळा झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या आरक्षणाला ग्राहय़ धरुन आलेले आरक्षण वगळून काही ग्रा. पं. ची सर्व गटातून थेट निवड करण्यात आली.
तर अनेक ग्रा. पं. त मागीलवेळी आरक्षण आले होते. अशा ग्रा. पं. ना या पूर्वीच्या दोन-तीन टप्प्यातील आरक्षण ग्राहय़ धरण्यात आली. तरीही काही ग्रा. पं. वर पुन्हा मागील आरक्षण येण्याची स्थिती लक्षात घेऊन अशा ग्रा. पं. ची लॉटरीद्वारे निवड करण्यात
आली.
यामुळे सदर आरक्षण अंमलात आणताना पूर्णत पारदर्शकता ठेवण्यात आली. आरक्षणाची माहिती सर्व सदस्यांना कळावी, याकरिता संगणक आधारीत डिजिटल बोर्डवर याची पूरक माहिती ठेवण्यात आली होती. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सदर आरक्षणाची पारदर्शक माहिती उपस्थित सदस्यांना
दिली.
काही इच्छुकात खुशी तर अनेकात नाराजी
ग्रा. पं. च्या 623 जागांकरिता झालेल्या निवडणुकीत अनेक जणांनी चुरशीने विजय मिळविला. आपल्याला अपेक्षित आरक्षण मिळणार या भावनेने गेल्या चार दिवसापासून अनेकानी मोर्चेबांधणी करुन बहुमतासाठी सदस्यांची जुळवाजुळवही केली आहे.
यामुळे बऱयाच इच्छुक सदस्यात आलेल्या आरक्षणामुळे खुशी दिसून येत होती. तर 75 टक्क्याहून अधिक सदस्यांमध्ये अपेक्षित आरक्षण आले नसल्याने नाराजी दिसून आली.
मोर्चेबांधणीला वेग
आरक्षण जाहीर झाल्याने आता आपल्या गटाचा सदस्य ग्रा. पं. वर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडून यावा, यासाठी मोर्चेबांधणीला वेग आला आहे. आरक्षण जाहीर होताच, अनेक ग्रा. पं. सदस्यांनी पाटील गार्डन आवारातच गटाचे राजकारण निर्माण केल्याचे चित्र दिसून येत होते. रात्री उशिरापर्यंत गावागावात आरक्षण आलेल्या सदस्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात करुन सदस्यांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. तर काही ग्रा. पं. मध्ये राजकीय पक्षाचे वारे वाहू लागल्याने सदस्यांना सहलीवर पाठवण्याचे बेतही सुरू झाले आहेत. तहसीलदार एस. एम. नाईक यांनी सर्व ग्रा. पं. निवडणूक अधिकाऱयांना बोलावून अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया कशी असणार, याबद्दल माहिती देऊन पुढील निवडणूक तारीख ठरवण्यात येणार असल्याचे सांगितले. एकूणच आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडून आलेल्या सदस्यामध्ये मोर्चेबांधणीला वेग आला असून गटबाजीचे राजकारण सुरू झाले आहे.









