मुरगेश निराणी यांच्याकडे मागणी
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्याचा औद्योगिक विकास घडवून बेरोजगारांना रोजगाराची संधी तसेच तालुक्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळवून द्या, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने राज्याचे औद्योगिक मंत्री मुरगेश निराणी यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात नगरसेवक आप्पय्या कोडोळी, जि. पं. माजी सदस्य जोतिबा रेमाणी तसेच वसंत देसाई यांनी बुधवारी बेंगळूर येथे मुरगेश निराणी यांची भेट घेऊन वरील विनंती केली.
खानापूर तालुक्यात यापूर्वी सिरॅमिक उद्योग तसेच मंगळुरी कौलांची निर्मिती करणारे कारखाने होते. यामुळे तालुक्यातील बेरोजगारांना रोजगाराची संधी निर्माण झाली होती. शिवाय तालुक्याच्या आर्थिक विकासालाही चालना मिळाली होती. पण बदलत्या परिस्थितीत तालुक्यातील सिरॅमिक उद्योग व मंगळुरी कौलांचे कारखानेही बंद पडले आहेत. यामुळे तालुक्यात बेरोजगारी वाढली आहे. तालुक्यात काम नसल्याने बरेच लोक गोवा व महाराष्ट्र येथे जाऊन त्या ठिकाणी काम करत आहेत. तसेच बेळगावच्या उद्यमबागमध्येही जाण्यावाचून त्यांना पर्याय नसतो. यामुळे तालुक्याची आर्थिक स्थितीही खराब होत चालली आहे. अशा परिस्थितीत खानापूर तालुक्यात नवनवीन उद्योगधंदे निर्माण होणे गरजेचे आहे. खानापूरला 9 एकरात उद्यमनगरी बसवण्यात आली आहे. पण त्या ठिकाणी मूलभूत सुविधा नसल्याने उद्योजकांना अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे त्या उद्यमनगरीच्या विकासाबरोबरच तालुक्यात मोठे उद्योग आणून तालुक्याचा आर्थिक विकास घडवा, अशी शिष्टमंडळाने मुरगेश निराणी यांना विनंती केली. यावेळी विधानपरिषद सदस्य हणमंत निराणीही उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री निराणी म्हणाले, यासंदर्भात मी लवकरच खानापूरला भेट देऊन तालुक्याच्या औद्योगिक विकासासाठी काय करता येईल, यासंदर्भात विचारविनिमय करून आपली मागणी मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न करेन, अशी ग्वाही दिली..









