खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुका म. ए. समितीच्यावतीने सोमवार दि. 11 रोजी लोकमान्य भवन खानापूर येथे सकाळी 11 वाजता नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांचा सत्कार करण्याचा निर्णय शिवस्मारकात झालेल्या खानापूर तालुका म. ए. समिती कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील होते.
प्रारंभी बबन उर्फ यशवंतराव विठ्ठलराव देसाई तसेच म. ए. समितीच्या इतर दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर म. ए. समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी प्रास्ताविक करून बैठकीचा उद्देश विषद केला. 17 जानेवारी हुतात्मा दिनी खानापूर तालुक्यात कडकडीत हरताळ पाळावा, तसेच सकाळी 8 वाजता स्टेशन रोड येथील कै. नागाप्पा होसूरकर हुतात्मा स्मारकाजवळ हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. सीमाप्रश्नाच्या सर्वोच्च न्यायालयातील दाव्याला चालना मिळण्यासाठी महाराष्ट्रातून नेते मंडळींची भेट घेण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर बैठक समाप्त झाली. बैठकील जि. पं. माजी सदस्य विलास बेळगावकर, प्रकाश चव्हाण, भू-विकास बँकेचे अध्यक्ष मुरलीधर पाटील, ता. पं. माजी सदस्य नारायण कापोलकर, नारायण लाड, डॉ. एल. एच. पाटील, शिवाजी क. पाटील, देवाप्पा भोसले, शिवाजी स. पाटील, जि. पं. माजी सदस्य विशाल पाटील, तानाजीराव कदम, प्रदीप पाटील, दीपक देसाई, पिराजी ब. पाटील, भैरू पुं. कुंभार, रुक्माण्णा झुंजवाडकर, प्रल्हाद मादार, ईश्वर बोबाटे, वसंतराव नावलकर यासह कार्यकर्ते उपस्थित होते.









