कापोली येथे समितीच्या एकीसंदर्भात आलेल्या प्रस्तावावर चर्चा : काही ठरावही संमत
वार्ताहर /खानापूर
तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक कापोली येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत खानापूर तालुक्मयातील समितीच्या एकीसंदर्भात आलेल्या प्रस्तावावर तसेच सीमाप्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच काही ठराव या बैठकीत करण्यात आले.
या बैठकीत झालेल्या चर्चेत सीमाप्रश्नाचा दावा बळकट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी सूचित करण्यासाठी मध्यवर्ती समितीशी संलग्न राहून काम करणे, 1993 च्या तोडग्यानुसार सीमाप्रश्न सोडवावा, अशी माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या गटाने केलेली मागणी ही अव्यवहारिक आहे, सीमावासियांच्यादृष्टीने अयोग्य आहे, तर आता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असून संपूर्ण सीमाभागातील घटक समित्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहून सीमाप्रश्न सोडवणुकीसाठी पाठपुरावा करणे, असे एकमताने ठरविण्यात आले.
खानापूर तालुक्मयातील म. ए. समितीच्या दोन्ही गटात लवकरात लवकर एकी साधने या मुद्दय़ावरदेखील सर्वांनी साधकबाधक चर्चा केली. दिगंबर पाटील गटाने त्रिसदस्यीय समितीने दिलेल्या पत्राला सकारात्मक उत्तरादाखल 12 ते 15 सदस्यांची कमिटी नेमून एकीच्या प्रक्रियेला चालना देण्यात यावी, त्याप्रमाणे 2 ते 3 दिवसांत पत्राद्वारे त्रिसदस्यीय कमिटीला कळविण्यात यावे, असा एकमताने निर्णय घेण्यात आला.
खानापूर युवा समिती ध्येयधोरणांशी बांधिल
खानापूर युवा समिती ही तालुका समितीच्या नेतृत्वाखालील युवकांची संघटना असून समितीच्या ध्येयधोरणांशी बांधिल आहे. समितीच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे कार्य सुरू आहे. सीमाप्रश्नाच्या लढय़ात युवकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी यापुढे जास्तीत जास्त युवकांनी यात सामील व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीला समिती कार्यकारिणी सदस्य मारुती परमेकर, जगन्नाथ बिरजे, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, युवा समितीचे धनंजय पाटील, रणजीत पाटील, किरण पाटील, विनायक सावंत, समितीचे सचिव गोपाळ देसाई, संभाजी देसाई, आनंद वाडकर, किशोर हेब्बाळकर, पी. एच. पाटील, सूर्याजी पाटील, राजू पाटील, पुंडलिक पाटील, दत्तू कुट्रे, कृष्णा गुरव, वासुदेव पाटील, रवींद्र पाटील, रवींद्र शिंदे आदी उपस्थित होते.









