प्रतिनिधी/ खानापूर
तालुक्याच्या ग्रातीण भागातील बससेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील बससेवेचे तीन तेरा वाजल्याचे दिसून येत आहे. त्यातच काही गावची वस्तीची बससेवा देखील बंद झाल्याने रात्री उशीरा घरी येणाऱया प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
कोरोना महामारीचा उपद्रव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर शासनाने बऱयाच गोष्टीत शिथीलता आणली आहे. त्यामुळे बाहेर पडणाऱया नागरिकांची संख्या वाढली आहे. मात्र परिवहनाची बससेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ग्रामीण भागातील लोकांची शहराकडे या ना त्या कारणासाठी ये जा असते मात्र वेळेवर बससेवा नसल्याने प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही लांबच्या पल्याच्या प्रवाशांसाठी बससेवा सुरळीत नसून काही गावातील वस्तीच्या बससेवा केंरोनामुळे बंद करण्यात आल्या असल्याने एखादी बस येईल का अशा आशेने प्रवासीवर्ग रात्री अपरात्री बसची वाट पाहत कितीतरी तास ताटकळत थांबतात सुदैवाने कोणी मोटार सायकलवाला दिसल्यास त्याच्याकडे पुढच्या गावापर्यंत सोडाल का? अशी मदत मागावी लागते. परिणामी काही गावांना खाजगी वाहनांची देखील सोय नसल्याने पायी वाट काढण्यावाचून पर्याय नाही.
1 जानेवारीपासून शाळा महाविद्यालये सुरु झाली आहेत. मात्र बससेवा नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. त्यातच बसेस नसल्याने अनेक विद्यार्थी खाजगी वाहनांच्या आधारे अक्षरशः लोंबकळून प्रवास करतात त्यांच्या तो जीवघेणा प्रवास थांबविण्याच्या दृष्टीने पावले उचलने गरजेचे आहे. त्यामुळे तालुक्यातील गोदगेरी, गोल्याळी, नागरगाळी, मेरडा, हलगा, कुंभार्डा, शिवठाण, बामनकोप्प, कापोली, हलसाल आदी गावांतील बससेवा सुरळीत करण्याची मागणी येथील प्रवासीवर्गातून होत आहे. तसेच खानापूर जांबोटी, कणकुंबी मार्गावरील बससेवेतही वाढ करावी अद्याप ग्रामीण भागातील ज्या मार्गावरच्या बससेंवा सुरु नाहीत त्या सर्व मार्गावरील बससेवा विना विलंब सुरु कराव्यात तसेच खानापूर बसस्थानकावर विद्यार्थी बसपास मिळण्याचीही तातडीने सोय करावी अशी मागणी केली जात आहे.









