तालुका विकास आघाडी-ग्रा.पं.सदस्य संघटनेचा धडक मोर्चा : शौचालयांच्या स्वच्छतेसाठी निवेदन : अधिकाऱयांचे सकारात्मक आश्वासन
बातमीदार /खानापूर
खानापूर तालुका आरोग्य केंद्रातील शौचालयांची रोजच्या रोज स्वच्छता होत नसल्याने तसेच काही शौचालये नादुरुस्त झाल्याने गलिच्छपणा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून शौचालयांची स्वच्छता व दुरुस्ती 24 तासांत करावी. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका विकास आघाडी व खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेतर्फे तालुका आरोग्य केंद्रावर धडक मोर्चा काढून देण्यात आला.
येथील तालुका आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱया रुग्णांवर योग्य उपचार केले जात नाहीत. त्यांना आवश्यक औषधे दिली जात नाहीत. त्यामुळेच अनेक रुग्णांचे हाल होत असल्याचे स्पष्ट झाल्याने खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी तालुका आरोग्य अधिकारी संजय नांदे यांच्याकडे तक्रार केली. येथील डॉक्टरांसह नर्स व कर्मचारी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून आर्थिक लूट करत असल्याची तक्रार खानापूर तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकाऱयांकडे केली.
दवाखान्याच्या स्वच्छतेसंदर्भात व रुग्णांकडून पैसे उकळू नये या संदर्भात दोन्ही संघटनांतर्फे तालुका आरोग्य अधिकाऱयांना निवेदन सादर करण्यात आले.
कर्मचाऱयांना समज देणार
तालुका आरोग्य अधिकारी संजय नांद्रे यांनी निवेदनाचा स्वीकार करून रुग्णांना योग्य ते उपचार देण्यात येतील तसेच दवाखान्याची स्वच्छता व रुग्णांची आर्थिक लूट होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, हे स्पष्ट केले. यावेळी विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, तालुका ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर आदींसह तालुक्मयातील निम्म्याहून अधिक ग्राम पंचायत सदस्य व विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









