वॅगन आरला ट्रकची धडक बसल्याने दुर्घटना
प्रतिनिधी / खानापूर

खानापूर – बेळगाव महामार्गावर मराठा मंडळ महाविद्यालयानजीक खानापूरकडे येणाऱया वॅगन आरला ट्रकची धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात एक ठार व दोन गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी 10. 30 च्या सुमारास घडली. या अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव मीरा महादेव सुतार (वय 61) असे असून जखमींमध्ये वॅगन आर चालक पंकज महादेव सुतार (वय 42) व पार्वती शंकर सुतार (वय 63) यांचा समावेश आहे. पंकज सुतार हे आपली आई मीरा महादेव सुतार व मावशी पार्वती सुतार यांना घेऊन करंबळ येथील धोंडदेव यात्रेला येत होते. वॅगन आर मराठा मंडळ महाविद्यालयाजवळ आली असता समोरुन येणाऱया ट्रकने जोरदार ठोकर दिली. या घटनेत तिघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मीरा सुतार यांच्या डोकीला गंभीर इजा झाल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तर पंकज सुतार व पार्वती सुतार हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद खानापूर पोलिसात झाली आहे.









