खानापूर / प्रतिनिधी
येत्या रविवार दि. 1 नोव्हेंबर काळय़ादिनी कडकडीत हरताळ पाळून सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत शिवस्मारकात होणाऱया लाक्षणिक उपोषणात सहभागी व्हा, असे आवाहन तालुका म. ए. समितीने शहरात पदयात्रा काढून केले आहे. यावेळी काळय़ादिनासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेली पत्रकेही वाटण्यात आली. या पदयात्रेचे नेतृत्व म. ए. समितीचे तालुका अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांनी केले आहे.
यावेळी वाटण्यात आलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की, 1 नोव्हेंबर रोजी लोकेच्छेचा गळा दाबून मराठी बहूल सीमाभाग कर्नाटकाच्या दावणीला बांधण्यात आला. तेंव्हापासून आम्हाला न्याय हक्कासाठी झगडावे लागत आहे. कर्नाटकाच्या मुजोरगिरीला आणि अन्यायाला जसा अंत नाही. तसेच सीमावासियांच्या मराठी प्रेम आणि महाराष्ट्र धर्मालाही तोड नाही. हे आपण सर्वानी दाखवून दिले आहे.
तुमची-आमची नाळ जोडलेल्या शिवबा, तुकोबा आणि ज्ञानोबांच्या महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न पाहणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे हुतात्म्यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासारखे आहे. आमच्या वाड-वडिलांनी, आजोबा, पणजोबानी ज्या ध्येयासाठी स्वतचा श्वासही सोडला त्यांचा विसर पडू न देणे व महाराष्ट्राची आस बाळगणे हा मराठी भाषिकांचा गुन्हा आहे का? 64 वर्षाच्या सीमालढय़ाच्या इतिहासात सीमा चळवळीने अनेक चढउतार पाहिले, विजय पाहिले आणि पराभवी पचविले. मुला-बाळांची व संसाराची पर्वा न करता जीवावर उदार होणारे कित्येक कार्यकर्ते समितीने घडविले.
पदापेक्षा चळवळ श्रेष्ठ आहे. समितीने अनेक निवडणुका लढविल्या आणि एखाद-दुसरा अपवाद वगळता सर्व जिंकल्याही. लढय़ाचा आणि मराठी वर्चस्वाचा भाग म्हणून निवडणूक लढविल्या गेल्या. त्यामुळे कधीही कर्नाटक सरकारच्या अत्याचाराला समिती डगमगली नाही. कार्यकर्ता आजही जोमाने लढतो आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू भरभक्कम आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा डंका वाजविणारे सुप्रसिद्ध कायदे पंडित बॅरिस्टर हरीष साळवे आपल्या महाराष्ट्राची बाजू मांडत आहेत. न्यायालयामध्ये सीमावासियांचा विजय ही काळय़ा दगडावरची रेघ आहे. त्यामुळे थोडय़ा काळय़ासाठी कोणीही थकून न जाता नव्या जोमाने कामाला लागणे आवश्यक आहे.
कोणी काहीही म्हणोत, कितीही अत्याचार करोत, सीमाप्रश्न आणि सीमाप्रश्न या एका शब्दापेक्षा काहीही आणि कुणीही मोठे नाही, याची मनाशी खुणगाठ बांधावी.
मराठी भाषिकांना कर्नाटकात डाबून ठेवण्याला 64 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निषेधार्थ आपण दि. 1 नोव्हेंबर हा काळादिन पाळतो. यासाठीच रविवार दि. 1 नोव्हेंबर 2020 हा काळा दिवस म्हणून आपले सर्व व्यवहार बंद ठेवून गांभीर्याने पाळावा. सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत शिवस्मारकातील कै. माजी आमदार व्ही. वाय चव्हाण सभागृहात होणाऱया लाक्षणिक उपोषणात उपस्थित रहावे, अशी या पत्रकातून मराठी जनतेला कळकळीची विनंती करण्यात आली आहे.
या पदयात्रेत कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, चिटणीस महादेव घाडी, देवाप्पा भोसले, शिवाजी पाटील, यशवंत पाटील, मोहन पारकर, रुक्माण्णा झुंजवाडकर, विवेक गिरी यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









