खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुका भाजपने गुरुवारी शोकसभेचे आयोजन करुन केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली अर्पण केली. सुरेश अंगडी यांच्या अकाळी निधनाने पक्षाची तसेच बेळगाव जिल्हय़ाची मोठी हानी झाली आहे. त्यांनी रेल्वेमंत्री म्हणून गेल्या दीड वर्षात केलेल्या कार्याला तोड नाही, त्यांनी मंजूर केलेली सर्व कामे पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात शोक ठरावही मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल होते.
प्रारंभी तालुका प्रधान कार्यदर्शी बसवराज सानिकोप यांनी सुरेश अंगडी यांच्या कार्याची आठवण करुन दिली. यानंतर पक्षाचे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सुरेश अंगडी यांच्या फोटोला पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. याप्रसंगी प्रमोद कोचेरी, संजय कुबल, विठ्ठल हलगेकर, विठ्ठल पाटील, आप्पय्या कोडोळी, पंडित ओगले, किरण यळळूरकर, जयंत तिनईकर, जोतिबा रेमाणी, श्रीकांत इटगी, भरमाणी पाटील यासह इतरांची मंत्री सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली वाहणारी भाषणे झाली. या शोकसभेला पक्ष कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









