प्रतिनिधी / खानापूर
येथील चौराशी गल्लीतील एका घराला मंगळवारी मध्यरात्री अचानक आग लागून घर व त्यामधील वस्तू, कपडे, धान्य, रोख रक्कम दीड लाख असे जवळपास 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घर कै. विजय कलाल यांच्या मालकीचे असून त्या घरात त्यांची पत्नी व दोन मुली राहतात.
मंगळवारी नेहमीप्रमाणे रात्री 10 नंतर घरातील सर्व लोक झोपी गेले होते. अशातच मध्यरात्रीनंतर साधारण 1 वाजता त्यांच्या घरातील पाठीमागील खोलीमध्ये अचानक आग लागली. त्याचवेळी घरातील झोपलेल्या लोकांना जाग आली. त्यांनी पाहिले असता पाठीमागील खोलीमध्ये आग लागली होती. त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूच्या घरातील लोकांना जाग आली. त्यांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आगीने रौद्ररूप धारण केल्याने अखेर अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे जवान पाण्याचा बंबासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी जवानांनी घरातील दोन सिलिंडर प्रथम बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यांच्या व आजूबाजूंच्या लोकांच्या अथक प्रयत्नातून अखेर आग विझविण्यात यश आले. तरीदेखील त्यांच्या घरातील तीन खोल्या आगीमुळे पूर्णत: जमिनदोस्त झाल्या. शिवाय घरातील सर्व भांडीकुंडी, कपडे, आहार, धान्य, रोख दीड लाख रुपये तसेच टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन यासारख्या किंमती इलेक्ट्रानिक वस्तू आगीत जळून खाक झाल्याने कलाल कुटुंबीयांचे जवळपास 6 लाखाचे नुकसान झाले आहे. राहिलेल्या घराचा भागही पाडवून नवीन घर बांधल्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. यावेळी उपस्थितांनी कलाल कुटुंबीयांना धीर दिला. आग वेळीच आटोक्यात आणली म्हणून बरे झाले. नाहीतर त्याची झळ आजूबाजूच्या घरांनाही पोहोचली असती.