प्रतिनिधी / खानापूर
देशावर ओढवलेल्या कोरोना संकटामुळे खानापूर शहर व तालुक्यात ख्रिसमसचा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यातच कर्नाटकात रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत संचारबंदी जाहीर केली होती. यामुळे तर खानापूरच्या मिलाग्रीज चर्चसह तालुक्यातील इतर चर्चमधील प्रार्थना गुरुवारी रात्री 9.30 वाजताच उरकण्यात आली. तर अनेक ख्रिस्ती बांधवांनी ऑनलाईनद्वारे या प्रार्थनेमध्ये सहभाग घेतला.
वास्तविक दरवर्षी 24 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता मुख्य प्रार्थना होते. पण कर्नाटक सरकारने ऐनवेळी रात्रीची संचारबंदी जाहीर केल्याने यावर्षी मात्र त्यामध्ये बदल करावा लागला. पण 24 डिसेंबर रोजी सायंकाळी राज्य शासनाने संचारबंदी मागे घेतल्याचा आदेश काढला. वास्तविक तो आदेशच काढला नसता तर नियमाप्रमाणे चर्चमधील प्रार्थना रात्री 12 वाजताच झाली असती. पण याला केवळ राज्य शासनाचा संचारबंदी संदर्भातील गेंधळच कारणीभूत ठरला. खानापूर तालुक्यात प्रामुख्याने खानापूर शहरासह मन्सापूर, तिवोली, हरनसवाडी, जांबोटी, निट्टूर, संगरगाळी, गुंजी, लोंढा, वाटरे, नावगा, नंदगड, माचीगड, हलशी, बिडी, कक्केरी, गोधोळी आदी गावांमध्ये ख्रिस्ती समाज वास्तव्यास आहेत. त्यापैकी अगदी लहान गावचा अपवाद वगळता इतर ठिकाणी चर्च आहेत. नाताळनिमित्त या सर्व चर्चमध्ये विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभर इतर धर्मियांनीही ख्रिस्ती समाजाला नाताळच्या शुभेच्छा दिल्या. तसेच काही ख्रिस्ती बांधवांनी इतर धर्मियांसाठी मेजवाणीचेही आयोजन केले होते. आता हा नाताळचा उत्सव 31 डिसेंबरपर्यंत चालणार असून या निमित्त चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.









