जागृती फेरीद्वारे आवाहन : तालुका म. ए. समितीच्या जागृती फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद : प्रमुख रस्त्यांवरून पत्रके वाटप
प्रतिनिधी / खानापूर
रविवार दि. 17 जानेवारी 2021 रोजी खानापुरात हुतात्मा दिन पाळण्यात येतो. या दिवशी मराठी भाषिक जनतेने हुतात्मा दिन गांभीर्याने पाळावा यासाठी म. ए. समितीतर्फे शुक्रवारी शहरातून जागृती फेरी काढण्यात आली. यावेळी पत्रकेही वाटण्यात आली.
पत्रकात असे म्हटले आहे की, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, संतपूरसह संयुक्त महाराष्ट्र आणि भाषावार प्रांतरचना याकरिता महाराष्ट्र एकीकरण समिती आणि संयुक्त महाराष्ट्र समिती यांनी उभारलेल्या आंदोलनात कुप्पटगिरी मधील कै. नागाप्पा होसूरकर आणि सीमाभागातील इतर अनेक जणांनी हौतात्म्य पत्करले. त्या सर्व हुतात्म्यांना आदंराजली वाहण्यासाठी संपूर्ण सीमाभागात प्रतिवर्षी 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळला जातो. कर्नाटकाच्या मुजोरगिरीला आणि अन्यायाला जसा अंत नाही, तसेच सीमावासियांच्या मराठी प्रेम आणि महाराष्ट्र धर्मालाही तोड नाही, ते आपण सर्वांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
तुमची आमची नाळ जोडलेल्या शिवबा, तुकोबा आणि ज्ञानोबाच्या महाराष्ट्रात जाण्याचे स्वप्न पाहणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे हुतात्म्याचे अधूरे स्वप्न पूर्ण करण्यासारखे आहे. आमच्या वाड-वडिलांनी, आजोबा, पणजोबानी ज्या ध्येयासाठी स्वतःचा श्वास सोडला. त्यांचा विसर पडू न देणे व महाराष्ट्राची आस बाळगणे हा मराठी भाषिकांचा गुन्हा आहे का? 66 वर्षाच्या सीमालढय़ाच्या इतिहासात सीमा चळवळीने अनेक चढउतार पहिले, विजय पाहिले आणि पराभवही पचविले. मुलां-बाळांची व संसाराची पर्वा न करता जीवावर उदार होणारे कित्येक कार्यकर्ते समितीने घडविले. पदापेक्षा चळवळ श्रेष्ठ आहे.
सीमाप्रश्नी न्यायालयात,महाराष्ट्राची बाजू भक्कम
समितीने अनेक निवडणुका लढविल्या आणि एखाद्-दुसरा अपवाद वगळता जिंकल्याही. लढय़ाचा आणि मराठी वर्चस्वाचा भाग म्हणून निवडणुका लढविल्या गेल्या. त्यामुळे कधीही कर्नाटक सरकारच्या दडपशाहीला समिती डगमगली नाही. कार्यकर्ता आजही जोमाने लढतो आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू भरभक्कम आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचा डंका वाजविणारे सुप्रसिद्ध कायदे पंडित बॅरीस्टर हरिष साळवे आपल्या महाराष्ट्राची बाजू मांडत आहेत. न्यायालयामध्ये सीमावासियांचा आवाज ही काळय़ा दगडावरची रेघ आहे. त्यामुळे थोडय़ा काळासाठी कोणीही थकून न जाता नव्या दमाने व नव्या जोमाने कामाला लागणे आवश्यक आहे.
खानापूर शिवस्मारकापासून शहरातील प्रमुख रस्त्यावरून पत्रके सर्वांना वाटण्यात आली. पत्रके वाटताना खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील, प्रकाश चव्हाण, म. ए. समितीचे कार्यकर्ते मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, महादेव घाडी, आबासाहेब दळवी, ब्रम्हानंद पाटील, डी. एम. भोसले, नारायण लाड, नारायण पाटील, शिवाजी के. पाटील, जि. पं. सदस्य नारायण कार्वेकर, ता. पं. माजी सदस्य नारायण कापोलकर, विठ्ठल गुरव, वसंत सुतार, रमेश पाटील, यशवंत पाटील, ईश्वर बोबाटे, प्रल्हाद मादार, बी. बी. पाटील, मल्हारी खांबले, अमृत पाटील, मऱयाप्पा पाटील, विवेक गिरी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यकर्त्यांनी सकाळी 8 वा. उपस्थित राहण्याचे आवाहन…
कोणी काहीही म्हणोत, कितीही अप्प्रचार करोत, सीमाप्रश्न या एका शब्दापेक्षा काहीही आणि कुणीही मोठे नाही, याची मनाशी खुणगाठ बांधावी. विद्यमान महाराष्ट्र सरकारनेही हा विषय गंभीरपणे घेतला आहे. सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाला कसल्याही प्रकारचा डाग लागू देणार नाही, आणि म. ए. समितीला कोणत्याही क्षणी एकाकी सोडणार नाही. प्रसंगी मृत्यू आला तरी चालेल पण तो सीमाप्रश्नासाठी झुंज देताना यावा, अशी शपथच आपण घेवूया आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू या. हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी दि. 17 रोजी सकाळी 8 वा. खानापूर स्टेशन रोडवरील हुतात्मा स्मारकाजवळ सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही पत्रकात करण्यात आले आहे.