प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर शहरातील व्हीसीएम विद्यार्थी वसतिगृहात क्वॉरंटाईन सेंटर करू नये, कशी विनंती तालुका भाजपच्यावतीने शनिवारी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांच्याकडें करण्यात आली. तालुक्यातील तोलगी गावातील एका कुटुंबातल्या 10 लोकांना खानापूरच्या बीसीएम विद्यार्थी वसतिगृहात क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. त्या कुटुंबातील काही सदस्यांचे हिरेबागेवाडी जाणे येणे सुरू होते. याची माहिती प्रशासनाला मिळताच खबरदारीचा उपाय म्हणून त्या कुटुंबातील सदस्यांचे क्वॉरंटाईन करण्यात आले. याची माहिती तालुका भाजपच्या पदाधिकाऱयांना कळताच तालुका भाजपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, विठ्ठल हलगेकर, धनश्री सरदेसाई, ज्योतिबा रेमानी, जॉर्डन गोन्सॉल्वीस आदी शिष्टमंडळाने तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांची भेट घेऊन विद्यार्थी वसतिगृहाच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे. अशा परिस्थीतीत त्या ठिकाणी क्वॉरंटाईन करणे योग्य नसल्याचे निदर्शनास आणले. यावेळी तहसीलदार रेश्मा तालीकोटी यांनी शिष्टमंडळाची विनंती मान्य करून त्या सर्वांना अन्य इमारतीमध्ये क्वॉरंटाईन करण्याचे आश्वासन दिले..









