प्रतिनिधी /बेळगाव
रशिया-युपेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटले आहेत. जागतिक पातळीवर वाढलेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आता वाढत्या महागाईला तोंड द्यावे लागणार आहे. एका दिवसात 15 किलो खाद्यतेलाच्या डब्यामागे 250 ते 300 रुपये वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या तेलदराचा चटका सोसावा लागणार आहे.
मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर स्थिर होते. मात्र रशिया-युपेनच्या युद्धामुळे तेलाच्या किमती भडकल्या आहेत. तेलाची आयात रशियातून होते. मात्र युद्धामुळे आयातच थांबल्याने तेल विपेतेही अडचणीत सापडले आहेत. दरम्यान वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे सर्वसामान्यांची फोडणी महागली आहे. हेल्थफीट 15 किलो डब्याचा दर 2580 रु., जेमिनी 2600, फॉर्च्युन 2580, सनरिच 2550, 10 किलो सोयाबिन डब्याचा दर 1610 तर सनफ्लॉवरचा दर 1630 रु. झाला आहे. सहा महिन्यांपूर्वी खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली होती. त्यानंतर दर काहीप्रमाणात कमी झाले होते. सध्या खाद्यतेलाचे दर स्थिर असताना युद्धाच्या परिणामामुळे दरवाढ झाली आहे. एक किलोमागे 10 रुपयानी तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक आणि गृहिणींना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने हॉटेल, मेस, रेस्टॉरंट आदींच्या व्यवसायांवर परिणाम होणार आहे. सर्वसामान्य जनतेला महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत.
सोने वधारले
रशियाने युपेनवर हल्ला केल्यामुळे याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर झाला. सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅमला 2 हजार रुपयांनी वाढ झाली. तर शुक्रवारी पुन्हा हा दर बाराशे ते पंधराशे रुपयांनी खाली आला. सोन्याच्या दरातील चढ-उताराचा परिणाम सोने खरेदी करणाऱया सर्वसामान्य ग्राहकांना बसला. दरामध्ये अचानक वाढ झाल्यामुळे सोने खरेदीचा टक्का खाली आहे.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा पहिला परिणाम हा शेअर बाजार, सोने व इंधन दरावर होतो. रशियाने युपेनवर हल्ला करताच मुंबई येथील सोने बाजारात बुधवारी प्रति 10 ग्रॅम तब्बल दोन हजारांनी दर वाढले. सोमवारी 52 हजार 500 ते 600 रुपये असणारा सोन्याचा दर गुरुवारी मात्र 54 हजार 600 वर पोहोचला. दर वाढल्याने ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरविली. यामुळे गुरुवारी सराफी पेढींवर शुकशुकाट पहायला मिळाला. सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही काहीशी वाढ झाली होती.
शुक्रवारी दरामध्ये घसरण
रशियाने युपेनच्या निम्म्याहून अधिक भागावर आक्रमण केल्यामुळे शुक्रवारी सोन्याचे दर खाली आले. गुरुवारी 54 हजार 600 रुपये असणारा सोन्याचा दर 53 हजार 100 पर्यंत खाली आला. सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे शुक्रवारी दुपारनंतर खरेदीसाठी काही प्रमाणात ग्राहकांची गर्दी सुवर्णपेढय़ांवर दिसून आली. युद्धजन्य परिस्थिती पूर्णपणे थांबल्यानंतर सोन्याचे दर अजून खाली उतरतील, असा अंदाज असल्याने खरेदीसाठी ग्राहक प्रतीक्षा करीत आहेत.
दर वाढल्याने ग्राहकांमधूनही नाराजी
मार्च महिन्यापासून लग्नसराईला सुरुवात होणार असल्याने त्यापूर्वीच सोने खरेदीसाठी सध्या सराफी पेढय़ांवर गर्दी होती. परंतु अचानक रशिया व युपेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने सोन्याचे दर वाढले. अचानक दर वाढल्याने ग्राहकांमधूनही नाराजी व्यक्त होत आहे. शुक्रवारी काही प्रमाणात दर खाली आल्याने खरेदीसाठी पुन्हा एकदा उत्साह दिसून आला.
-संजय पोतदार (पोतदार ज्वेलर्स)
बेळगाव सराफी पेढय़ांवरील सोने-चांदीचे दर
| तारीख | सोने दर (प्रति दहा ग्रॅम) | चांदी दर (प्रतिकिलो) |
| 21-02-2022 | 52500 | 67000 |
| 24-02-22 | 54600 | 71800 |
| 25-02-2022 | 53100 | 68300 |









