दर कमी झाल्याने नागरिकांतून समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनाकाळात आधीच नागरिकांवर बेरोजगारी आणि पगार कपातीची टांगती तलवार आहे. अशावेळी खाद्यतेलाच्या किमती वाढल्याने कुटुंबांचे बजेटही कोलमडले होते. मात्र, आता खाद्यतेलाच्या दरात प्रतिकिलो 10 रुपयांनी घट झाल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे खाद्यतेलाची खरी मागणी ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणाऱया सणांच्या हंगामात वाढते. मागणी जास्त तेव्हा भाववाढ जास्त या न्यायाने तेलाच्या किमतीही तेव्हाच वाढतात. पण, यंदा फेब्रुवारी-एप्रिल महिन्यांपासूनच ही दरवाढ महिलांना सोसावी लागली. परिणामी तेलाच्या किमती वाढल्याने आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागल्याने कमी तेलात स्वयंपाक बनविण्यास महिलावर्गाने भर दिला होता.
तेलाच्या किमती भरमसाट वाढल्या असल्या तरी अनलॉकच्या पहिल्याच दिवशी तेलाच्या दरात कपात झाल्याने नागरिकांच्या चेहऱयावर समाधान दिसून आले. मात्र, चढय़ादराने खरेदी करून कमी किमतीला तेलाची विक्री करावी लागत असल्याने व्यापाऱयांमध्ये नाराजी दिसून आली. याचबरोबर तेलाच्या किमती आणखी कमी होऊन नुकसान सोसावे लागू नये, या हेतूने मिळेल त्या दरात तेलाची विक्री करण्यात आली.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी शंभरी गाठलीच आहे. त्यात भरीस भर म्हणून खाद्यतेल आणि इतर साहित्याच्या किमती वाढल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागल्याने संताप व्यक्त होत आहे. मात्र, तेलाची किंमत ज्याप्रमाणे कमी झाली आहे, त्याप्रमाणे सर्व साहित्यांची किंमत कमी व्हावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.









