महिन्याच्या आत 10 हजार दिव्यांची विक्री
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खादी ग्रामोद्योग संघाने मातीच्या पणत्यांची विक्री मोठय़ा प्रमाणात केली असल्याचे दिसून आले आहे. ही विक्री ऑनलाईन व स्टोअर्सच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ‘वोकल फॉर लोकल’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर खादी ग्रामोद्योग संघाने ऑनलाइन आणि स्टोअर्सच्या माध्यमातून पणत्यांसह इतर उत्पादने विकायला सुरूवात केली.
सर्वात पहिल्यांदा 8 ऑक्टोबरला दिव्यांची विक्री ऑनलाइन सुरू केली. केवळ महिन्याच्या आतच 10 हजारहून अधिक मातीच्या पणत्यांची ऑनलाइन विक्री झाली आहे. कंपनीच्या डिझायनर दिव्यांना चांगली मागणी दिसून आली आहे. 12 पणत्यांच्या सेटकरिता संघाने 84 रुपये आणि 108 रुपये इतकी किंमत ठेवली होती. त्याचसोबत 10 टक्के सवलतही संघाने दिली होती. याला भारतीयांनी उत्तम प्रतिसाद नोंदवला आहे. या पणत्यांसोबत लक्ष्मी-गणेश मूर्ती आणि इतर सजावटी मातीच्या साहित्याची देशभरातील विविध स्टोअर्समधून उत्तम विक्री केली गेली आहे.