नवी दिल्ली
ऍमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडिलसारख्या ई-कॉमर्स विक्रेत्यांनी खादी नावाने सुमारे 160 बनावट उत्पादने अलीकडेच विकली असल्याचे समोर आले आहे. यावरून खादी ग्रामोद्योग संघाने इ-कॉमर्स क्षेत्रातील ऑनलाइन कंपन्यांना तंबी दिली आहे. खादी ग्रामोद्योगाने याबाबत आक्षेप घेतल्यानंतर ई-कॉमर्स कंपन्यांनी आपल्या पोर्टलवरील खादीचा उल्लेख अखेर मागे घेतला आहे, असे समजते. खादी ग्रामोद्योग संघाने याबाबत कारवाई करताना सुमारे 1000 कंपन्यांना याबाबत कायदेशीर नोटीसा पाठविल्या आहेत. या कंपन्या खादी इंडिया ब्रँड नावाचा गैरवापर करत खादीच्या नावावर बनावट उत्पादने विकत होत्या, असे समजून आले आहे. यासंदर्भात खादी संघाकडे तक्रारी आल्यानंतर यासंदर्भात कारवाईचे पाऊल घेणे संघाला भाग पडले. नोटीसा आल्यावर 160 हून अधिक बनावट उत्पादने विविध कंपन्यांनी आपल्या वेबसाईटवरून मागे घेतली आहेत. याअंतर्गत मास्क, हर्बल, साबण, शॅम्पू, सौंदर्य प्रसाधने हर्बल मेंदी, जॅकेट, कुर्ता आदी उत्पादने बनावट खादी नावावर विकली होती, असेही दिसून आले.









