राष्ट्रीय ग्राहक न्यायालयाचा महत्वाचा निर्णय, कोटय़वधी ठेवीदारांना दिलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्या बँकेच्या खात्यातून पैसे गायब होण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. याच संदर्भात राष्ट्रीय ग्राहक न्यायालयाने एक महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला आहे. हॅकिंगच्या माध्यमातून ठेवीदाराच्या खात्यातून कोणी पैसे गायब केल्यास त्याचे उत्तरदायित्व ठेवीदारावर नव्हे तर बँकेवर आहे, असे या निर्णयात सांगण्यात आले आहे. यामुळे ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे.
एका विख्यात खासगी बँकेतील ठेवीदाराच्या खात्यातून 14 ते 20 डिसेंबर 2008 या कालावधीत 6 हजार डॉलर्सची रक्कम काढण्यात आली होती. या ठेवीदाराने त्याच्या लॉस एंजल्स येथे राहणाऱया मुलीच्या नावे क्रेडिट कार्ड काढले होते. ठेव या मुलीच्या नावाने होती. मात्र पैसे काढण्याचा कोणताही व्यवहार या ठेवीदारांने केला नव्हता. रक्कम काढल्याची माहिती बँकेने ठेवीदाराला कळवली. मात्र ठेवीदाराने आपण पैसे काढले नसल्याचे बँकेला कळवले. मात्र काढल्या गेलेल्या पैशाचे उत्तरदायित्व स्वीकारण्यास बँकेने नकार दिला. त्यानंतर ठेवीदाराने ग्राहक न्यायालयात दाद मागितली. कनिष्ठ ग्राहक न्यायालयाने पैशाचे उत्तरदायित्व बँकेचे असल्याचा निर्णय देत ठेवीदाराच्या बाजू उचलून धरली.
प्रकरण राष्ट्रीय ग्राहक न्यायालयात
बँकेने या निर्णयाविरोधात राष्ट्रीय ग्राहक न्यायालयात अपील केले होते. त्याचा निर्णय सोमवारी झाला. बँकेचे अपील फेटाळण्यात आले. बँकेच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेत काही तरी चूक आहे. त्यामुळे हॅकर्सनी रकमेचा अपहार केला आहे. त्यामुळे हे उत्तरदायित्व बँकेचे आहे, असा आरोप ठेवीदाराने केला होता. राष्ट्रीय ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश सी. विश्वनाथ यांनी हा निर्णय दिला.
बँकेचेच उत्तरदायित्व
ठेवीदाराचे पेडिट कार्ड चोरीला गेले आहे, हे बँक सिद्ध करू शकलेली नाही. त्यामुळे ठेवीदाराचे पैसे सुरक्षित ठेवण्याचे उत्तरदायित्व बँकेचेच आहे. बँकेच्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेवर ठेवीदाराचे नियंत्रण असू शकत नाही. ही यंत्रणा बँकेच्याच नियंत्रणात असते. त्यामुळे बँक उत्तरदायित्व टाळू शकत नाही. असे या प्रकरणाच्या निर्णय राष्ट्रीय ग्राहक न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
ओटीपी कोणालाही सांगू नका
बऱयाचदा ‘आपल्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, तरी आपल्याला एक ओटीपी येईल, तो आम्हाला सांगा असा संदेश एसएमएसवर येतो. हा ओटीपी संदेश पाठविणाऱयाला दिला तर त्वरित आपल्या खात्यावरील पैसे गायब होण्याचा अनुभव अनेकांना आला आहे. कोणत्याही कारणास्तव आणि कोणाकडूनही आपल्याला ओटीपी आला असेल तर तो कोणालाही सांगू नका, असा इशारा तज्ञांनी दिला आहे. ओटीपी समजल्यास हॅकर्स त्याचा दुरूपयोग करून आपल्या खात्यातील पैसे लंपास करू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने ओटीपी कोणालाही न सांगण्याची दक्षता घेतलीच पाहिजे, असे सांगण्यात आले आहे. या दक्षतेचा या बँक प्रकरणाशी संबंध नाही. तथापि, पैसे लंपास करण्याची संधी हॅकर्सना मिळू नये यासाठी आपले डेबिट कार्ड, पेडिट कार्ड किंवा आपल्या ठेवखात्याशी संबंधित ओटीपी कोणत्याही कारणास्तव कोणालाही न सांगणे सुरक्षित असते असा महत्वाचा सल्ला हॅकिंगच्या सदंर्भात तज्ञांनी दिला आहे.









