मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची घेतली भेट
प्रतिनिधी /बेंगळूर
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी नूतन मंत्र्यांना खातेवाटप केल्यानंतर काही मंत्र्यांनी आपल्याला दिलेल्या खात्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याबद्दल हायकमांडजवळ चर्चा करण्यात येईल, असा भरवसा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. रविवारी मंत्री एमटीबी नागराज आणि आनंद सिंग यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन दिलेल्या मंत्रिपदाबद्दल नाराजी व्यक्त केली. या दोघांनाही भरवसा देऊन बसवराज बोम्माई यांनी पाठवून दिले.
यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रशासन, लघु उद्योग, सार्वजनिक उद्योग मंत्री एमटीबी नागराज यांनी, मला दुय्यम दर्जाचे खाते देत ए ग्रेडवरून बी ग्रेडवर आणले आहेत. मला दिलेल्या खात्याबद्दल वरिष्ठांशी चर्चा करेन, असा भरवसा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आगामी दिवसात खाते बदलून देण्याचा विश्वास आहे. मला राज्यातील जनतेसोबत राहून काम करणारे खाते हवे आहे, असे त्यांनी सांगितले. यापूर्वी मी वसती खात्याची मागणी केली होती. यावेळेस त्यापेक्षा उत्तम खाते देतील, असे वाटले होते. समाज कल्याण, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास आणि परिवहन खात्यापैकी कोणतेही एक खाते द्यावेत, असेही मंत्री नागराज म्हणाले.
पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आनंद सिंग यांनी रविवारी आपल्या कुटुंबासमवेत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. शनिवारी खातेवाटप केल्यानंतर मिळालेल्या खात्याबद्दल आनंदसिंग यांनी नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आनंदसिंग यांनी पत्रकारांशी कोणतीच प्रतिक्रिया न देता परतले. त्यानंतर मंत्री डॉ. के. सुधाकर आणि आमदार सतीश रेड्डी यांनी मुख्यमंत्री बोम्माई यांची भेट घेऊन चर्चा केली.









