‘गोवा मायनिंग पिपल्स प्रंट’ची मागणी : खाणी सुरु करणे सरकारच्याच हाती
प्रतिनिधी / फोंडा
सर्वोच्च न्यायालयाकडून राज्यातील खनिज डंप वाहतुकीसाठी मिळालेली परवानगी हा तात्पुरता पर्याय झाला. मात्र राज्य सरकारने संपूर्ण खाण उद्योग पूर्ववत सुरु केल्याशिवाय खाण अवलंबितांचा प्रश्न सुटणार नाही. खाणी सुरु करणे हे सरकारच्याच हातात आहे व ते शक्य नसल्यास राज्यातील 3 लाख खाण अवलंबितांची जबाबदारी स्वत: सरकारने घ्यावी, अशी मागणी गोवा मायनिंग पिपल्स प्रंटने केली आहे.
केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे. राज्यातील खाणी सुरु करणे हे सर्वस्वी राज्य सरकारच्याच अखत्यारीत येते. कायदेशीररित्या ते शक्य असून सरकारची इच्छाशक्ती हवी, असे प्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी काल बुधवारी फोंडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
खाणी सुरु होणे आवश्यक
कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. ती पुन्हा मार्गी लावण्यासाठी यंदाच्या हंगामात खाणी सुरु होणे गरजेचे आहे. शिवाय राज्यातील 60 हजार खाण कामगारांसह ट्रकमालक, बार्जमालक, मशिनमालक आणि व्यावसायावर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष विसंबून असलेल्या 3 लाख खाण अवलंबिताच्या भवितव्याचा प्रश्न आहे. राज्यातील 88 खाणींच्या लिजांचे तातडीने नूतनीकरण करुन खाण उद्योग पूर्ववत सुरु करणे शक्य आहे. सरकारला ते शक्य नसल्यास 60 हजार खाण कामगारांच्या रोजगाराची व्यवस्था करावी. शिवाय ट्रक मालक, बार्ज मालक व मशीन मालकांच्या कर्जफेडीची जबाबदारीही सरकारने उचलावी, असा प्रस्ताव पुती गावकर यांनी मांडला.
यावेळी विनायक गांवस, रमेश सिनारी, संदेश गावस व संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
दरवाढीशिवाय ट्रक रस्त्यावर नाही : गावस
विनायक गावस म्हणाले, सध्या डंप वाहतुकीसाठी जी परवानगी मिळाली आहे, त्यातून ट्रकमालकांना केवळ तीन महिने काम मिळणार आहे. सध्या ट्रकमालकांना जो वाहतूक दर मिळतो, त्यातून नफा सोडाच ट्रकांचा खर्चही सुटणार नाही. दरवाढ निश्चित होईपर्यंत एकही ट्रक रस्त्यावर उतरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. वाढीव दर लागू करताना मागील पाच वर्षांचा दरफरक देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
खाण उद्योग तातडीने सुरु करावा : सिनारी
रमेश सिनारी यांनी खाण बंदी व त्यानंतर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटामुळे खाण कामगारांची परिस्थिती अत्यंत बिकट बनल्याचे सांगून सेझा कंपनी येणाऱया काळात कामगारांना कमी करणार असल्याचे संकेत दिले. सरकारने कामगारांना या बिकट परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तातडीने खाण उद्योग सुरु करण्याची मागणी सिनारी यांनी केली.









