महसूल प्रशासनाची डोळेझाक : देवली-वाघवणे, आंबेरी वाकवाडी, चिपी ग्रामस्थांनी वेधले जिल्हाधिकाऱयांचे लक्ष : ….अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा
प्रतिनिधी / मालवण:
कर्ली खाडीमध्ये देवली-वाघवणे व आंबेरी-वाकवाडी (चिपी जुवा) बेट येथे वाळूची अक्षरश: लूट चाललेली आहे. नजीकच असलेल्या कोटय़वधी रुपये खर्चून बांधलेल्या कर्ली पुलापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर सुद्धा वाळू उत्खनन जोरात सुरू आहे. (शासन धोरणानुसार पुलाच्या दोन्ही बाजूस 600 मीटर प्रतिबंधित क्षेत्र आहे.) त्यामुळे कर्ली पुलाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. देवली-वाघवणे येथे खाडीलगत 1800 मीटरचा खारबंधारा आहे. देवली-वाघवणे येथील ग्रामस्थांची घरे, शेतजमीन, माडबागायती यांचे अस्तित्वच या खारबंधाऱयावर अवलंबून आहे. अवैध आणि अतिरिक्त वाळू उत्खननामुळे सुमारे 600 मीटर खारबंधारा खचून गेला आहे. जर पूरस्थिती निर्माण झाली आणि खारबंधारा तुटला, तर ग्रामस्थ व शेतकऱयांची घरे, शेतजमीन, माडबागायती यांचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते. यामुळे जिल्हाधिकाऱयांनी पाहणी करण्याची मागणी देवली-वाघवणे, आंबेरी वाकवाडी आणि चिपी येथील शेतकरी, ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.
देवली-वाघवणे व आंबेरी-वाकवाडी येथील ग्रामस्थांवर या वाळू माफियांच्या माध्यमातून आपण प्रशासनाने आम्हा सामान्य ग्रामस्थांना गुन्हेगार किंवा कैदी असल्यासारखी वागणूक दिलेली आहे हे खरोखरच दुर्दैव. आपणाकडे वारंवार निवेदन देऊनही या गोष्टींची तड लागत नसेल, तर बेमुदत उपोषण करून न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा निर्णय आम्ही ग्रामस्थांनी घेतलेला आहे, असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.
ते म्हणतात, ग्रामस्थ, शेतकऱयांची घरे, शेतजमीन, माडबागायतीस लागूनच ही कर्ली खाडी जाते. आंबेरी वाकवाडी येथील नदीपात्रासमोर चिपी जुवा (बेट) आहे. सुंदर असे हे निसर्गनिर्मित बेट भविष्यात चांगले पर्यटनस्थळ म्हणून विकसीत होऊ शकते. हे बेट आंबेरीतील रहिवाशांच्या मालकीचे आहे व त्या बेटावर माडबागायती व वर्षातून दोनवेळा उत्पन्न देणारी भातशेती आहे. वाळू उत्खननामूळे हे बेट नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतीकामासाठी शेतकऱयांची व त्यांच्या बैलांची या नदीतून ये-जा असते. शेती करणारे महिला व पुरुष हे त्यांच्या मालकीच्या छोटय़ा होडय़ातून प्रवास करतात. या वाळू माफियांच्या मालकीच्या इंजिनच्या मोठय़ा होडय़ा (6 व 9 ब्रास) असल्यामुळे जेव्हा त्या नदीत ये-जा करतात, तेव्हा नदीत प्रचंड लाटा निर्माण होतात व त्यामुळे या शेतकऱयांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. या शेतीच्या उत्पन्नावरच सर्व शेतकऱयांची उपजीविका चालते.
अनधिकृत वाळू उत्खनन सुरूच
यापूर्वी चिपी ग्रामस्थांनीही बेसुमार अवैध उत्खननाबाबत संबंधित अधिकाऱयांना भेटून व निवेदन देऊन या विषयावर गांभीर्याने लक्ष देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु, वाळूमाफिया रात्रंदिवस बेसुमार अवैध वाळूउपसा करत आहेत. कर्ली खाडीतील चिपी हद्दीतील खारबंधारा सुद्धा सततच्या वाळू उत्खननामुळे पूर्णपणे खचला आहे. वाळू उपशामूळे खाडीचे पात्र रुंद होत असून हे खारे पाणी शेतात, माडबागायतीत घुसून शेतकऱयांचे नुकसान होते. सद्यस्थितीत पाहणी करून या अनधिकृत आणि अतिरिक्त वाळू उत्खननावर कडक कारवाई करावी. यात गावातील काही स्वयंघोषित पुढाऱयांचे भ्रष्ट महसूल अधिकारी तसेच पोलीस खात्यातील काही भ्रष्ट कर्मचाऱयांचे आर्थिक संबंध आहेत, असा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
मेरिटाईम बोर्डाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!
सद्यस्थितीत वाळू उत्खननास बंदी असताना कर्लीखाडीमध्ये वाळू उत्खननास वापरण्यात येणाऱया होडय़ा नदी पात्रात उभ्या आहेत. त्या होडय़ांवर कारवाई होणे अपेक्षित आहे, परंतु मेरिटाईम बोर्ड या होडय़ांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सगळ्य़ा अवैध कारभाराचा बंदोबस्त करून देवली-वाघवणे व आंबेरी-वाकवाडी खाडी किनाऱयावरील राहणाऱया ग्रामस्थांची ही पिढी आणि पुढे येणाऱया पिढय़ा बरबाद होण्यापासून वाचवा. आताचे वाळू उपगट क्र. D-1, D-2, D-5, E-1, E-2, E-3, E-4 या क्षेत्रात निसर्गनिर्मित बेटे, खारबंधारा आणि कर्ली पूल येत असल्यामुळे या सर्व उपगटांमध्ये सध्याचे अवैध उत्खनन थांबवून वाळू उत्खननास कायमस्वरुपी बंदी आणावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.









