मधुरा जांभळे व आर. टी.घुंगूरकर यांचे सुयश
वार्ताहर / सांगरुळ
करवीर तालुक्यातील विद्यामंदिर खाटांगळे या शाळेची चिमुकली मधुरा भगवान जांभळे हिने काव्यगायन व पदवीधर अध्यापक आर. टी. घुंगूरकर यांनी शब्दरचना केलेल्या कवितेला राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला. गुरु-शिष्याच्या या जोडीने महाराष्ट्राच्या व्यासपीठावर कोल्हापूरचा झेंडा फडकावला. निमित्त होते सलाम मुंबई व महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेचे!
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या. नाटक, गाणी, कविता, चारोळी, व पोस्टर अशा स्पर्धा घेण्यात आल्या. महाराष्ट्रातील ३४ जिल्हयातील २४० स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. खाटांगळे शाळेची कवितेसाठी जिल्ह्यातून निवड करण्यात आली होती. “बनवूया देश सारा” ही कविता पाठवण्यात आली होती.
या स्पर्धेचा निकाल एका राज्यस्तरीय वेबीनारमध्ये जाहीर करण्यात आला. या वेबीनारला सिनेअभिनेते संदिप पाठक प्रमुख पाहुणे होते. तर वेबीनारच्या व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (एन्.सी.ई.आर.टी.) उपसंचालिका डॉ. कमलादेवी आवटे व बालभारतीचे विशेषाधिकारी राजीव पाटोळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सलाम मुंबईच्या अजय पिळणकर, दिपक पाटील, महाराष्ट्र तंबाखुनियंत्रण कार्यक्रमाच्या उपाध्यक्षा राजश्री कदम, संजय ठाणगे, सचिन वानखेडे यांनी केले. मधुरा जांभळे व आर टी घुंगूरकर यांना मुख्याध्यापिका मीना वळवी, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे सहकार्य लाभले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, गटशिक्षणाधिकारी शंकर यादव, शशीकांत कदम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव पाटील व सर्व सदस्य यांचे प्रोत्साहन लाभले.









