साहित्य : 1 वाटी खवा, पाऊण वाटी पनीर, 3 चमचे मैदा, 2 चमचे रवा, अर्धा चमचा वेलची पावडर, 1 चमचा दूध, पाव चमचा बेकिंग पावडर, तेल तळण्यासाठी, पाकसाठीः 250 ग्रॅम साखर, 1 वाटी पाणी, 1 चमचा गुलाबजल, 1 चमचा दूध
कृती : पनीर खिसून घ्यावे. खव्यामध्ये गुठळय़ा न राहता मळून घ्यावा. नंतर त्यात खिसलेले पनीर, रवा, मैदा, बेकिंग पावडर आणि वेलची पावडर घालून मिश्रण मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात दूध घालून त्यात गुठळय़ा न राहता मळून घ्यावे. गोळा जास्तच मऊ झाला असल्यास त्यात दूध पावडर मिक्स करून शकता. नंतर त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून घ्यावेत. आता पाक बनविण्यासाठी पातेल्यात पाणी ओतून एक उकळी काढावी. नंतर त्यात साखर टाकून पूर्णपणे विरघळवून घ्यावी. नंतर त्यात गुलाबजल घालावे. आता मंद आचेवर कढईत तेल गरम करून त्यात गुलाबजामचे गोळे सोनेरी रंगावर तळावेत. पाक कोमट असतानाच त्यात गुलाबजाम मुरण्यास घालावेत. एक तासानंतर गुलाबजाम पाकात मुरले की खाण्यास द्या.









