मुंबईत बोटीवरून झाली सुटका : सध्या हॉटेलात मुक्काम : शनिवारी, रविवारी गोव्यात पोहोचणार
प्रतिनिधी / पणजी
मुंबईत अडकून पडलेल्या गोव्यातील खलाशांच्या सुटकेची प्रक्रिया सुरू झाली असून मारेला डिस्कव्हरी या बोटीवरील खालशांची कोविड चाचणीही केली जाणार आहे. या खलाशांना काल गुरुवारी मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. कर्णिका व आंग्रीया या बोटीवरील खलाशांनाही गोव्यात आणण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गोव्यातील 189 खलाशी या तीन बोटीवर आहेत. डी. जी. शिपिंग आणि केंद्र सरकारच्या निर्णयानंतर या खलाशांच्या सुटकेला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे खलाशी व त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गोवा सरकार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक तसेच मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी या खलाशांच्या सुटकेसाठी वेळोवेळी प्रयत्ने केले आहे. गेले सुमारे महिनाभर हे खलाशी मुंबईत बोटीवर अडकून पडले आहेत. मुंबईतील कोरोनाचे प्रमाण वाढू लागल्याने हे खलाशी बोटीवरच अडकून पडले. बोटीवर अडकून पडलेल्या खलाशांना गोव्यात आणले जावे यासाठी आपल्या कुटुंबियांमार्फत सरकारला विनंती केली. तसेच मंत्री आमदारांशी संपर्क साधून त्यांनाही विनवणी केली. मुख्यमंत्र्यांशीही यापैकी काहींनी संपर्क साधला. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालय केंद्र सरकारकडे संपर्क साधून होते. अखेर गुरुवारी प्रत्यक्ष प्रक्रिया सुरु झाली आहे.
चाचणीनंतर खलाशांच्या निवासाची सोय हॉटेलमध्ये
मारेला डिस्कव्हरी ही बोट खलाशांसह सुमारे महिनाभर अगोदर मुंबईत दाखल झाली होती. या बोटीवर गोव्यातील 66 खलाशी होते. या युरोपियन बोटीवरील खलाशांचा आक्रोश सुरू होता. कारण ही बोट पुन्हा युरोपला जाण्याच्या तयारीत होती. गुरुवारी 23 रोजी मारेला डिस्कव्हरी युरोपला प्रयाण करणार असेही सूचित करण्यात आले होते. त्यामुळे मुख्यमंत्री व केंद्रीय आयुषमंत्री यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकून डी. जी. शिपिंगकडून मान्यता मिळविली. गुरुवारी सकाळीच मारेला डिस्कव्हरीवरील खलाशांची चाचणी करून त्यांना मुंबईतील हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे. मारेला डिस्कव्हरीवरील खलाशांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना बोटीवरून हॉटेलमध्ये हलविल्याचे सांगितले.
कार्णिका व आंग्रिया या जहाजावरील खलाशांनाही चाचणी करून उतरविण्यात येणार आहे. त्यानंतरच त्यांना गोव्यात आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ज्या खलाशांना मुंबईत हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे त्यांना गोव्यात शनिवारी किंवा रविवारी आणण्याची शक्यता आहे.
हॉटेलमध्ये 48 तास ठेवणार
मारेला डिस्कव्हरी या जहाजातून मुंबईत उतरविलेल्या खलाशांना 48 तास हॉटेलवर ठेवण्यात येणार आहे. चाचणी अहवाल आल्यानंतर गोव्यात आणण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. संशयास्पद आढळल्यास मुंबईतच कोरोंटाईन केले जाईल. नपेक्षा दोन दिवसात त्यांना गोव्यात आणले जाईल.
विदेशातील 8000 खलाशांनाही आणणार
गोव्यातील सुमारे 8000 खलाशी विदेशात अडकून पडले आहेत. खोल समुद्रात बोटीवर खलाशी अडकून पडले आहेत. त्यांना आणण्यासाठीही गोवा सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने प्रयत्न चालविले आहेत. सर्व 8000 खलाशांना गोव्यात आणले जाईल. 3 मेपर्यंत या खलाशांना आणण्यात येणार आहे. त्यांना टप्प्याटप्प्याने आणले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आसुसलेल्या डोळय़ांना मायभूमी दिसणार
कोरोनाच्या संकटामुळे धोक्यात आलेल्या गोव्यातील खलाशांनी मागील अनेक दिवस बोटीवरच काढले. जगभरात कोरोनाने हाहाकार माजविल्याने मायदेशी कसे जायचे हा मोठा प्रश्न या खलाशांसमोर होता. गोव्यातील हजारो तरुण दरवर्षी नोकरीच्या शोधात विदेशात जातात. यापैकी अनेक तरुण खलाशी म्हणून बोटीवर जातात. डिसेंबरपासून कोरोनाचे जीवघेणे संकट निर्माण झाले होते. सर्वच देशांनी माणसांची स्वदेशी पाठवणी बंद केली. त्यामुळे भारतात आणि पर्यायाने आपली मायभूमी गोव्यात आपण पोहोचणार की नाही अशी शंका या खलाशांना होती.
बोटीवरील एखाद्या व्यक्तीला जरी लागण झाली तरी सगळेच धोक्यात येण्याची शक्यता होती. एखाद्याला साधा ताप जरी आला तरी समोर कोरोनाचीच भीती होती. बंदरावर बोटी आणण्यास मान्यता दिली जात नाही. अशा स्थितीत या खलाशांनी अक्षरशः भयाण स्थिती अनुभवली. जीवंतपणी मायभूमीत पोहोचणार किंवा नाही असाही संशय त्यांच्या मनात डोकावला, पण मोठा धीर धरून या खलांनी कित्येक दिवस बोटीवर काढले. आता दीर्घ प्रतिक्षेनंतर त्यांना गोव्यात पाऊल ठेवता येणार आहे. या खलाशांना मुंबई पोर्टवर उतरविल्याने त्यांच्या कुटुंबियांचाही जीव भांडय़ात पडला आहे.









