प्रतिनिधी / वास्को
जहाजांवर अडकलेल्या गोव्यातील शेकडो खलाशांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. या खलाशांना परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.
दाबोळीतील कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोव्यात कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती व सरकार ही परिस्थिती हाताळण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करून लवकरच आशादायी वातावरण निर्माण होणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला फुले वाहून त्यांना श्रध्दांजली वाहिली.
ते म्हणाले की गोव्यातील शेकडो लोक विविध जहाजांवर अडकले आहेत. शिवाय देशाबाहेर आणि राज्याबाहेरही बरेच गोवेकर अडकलेले आहेत. त्यांची सरकारला चिंता आहे. गोव्यातील खलाशांच्या प्रश्नावर सरकार गंभीर आहे. येत्या मंत्रीमंडळ बैठकीत त्यांच्या प्रश्नावर चर्चा होईल.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने चांगली कामगिरी बजावली असून चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी मायनिंग फंडचा वापर करण्याचा निर्णय घेतला तो योग्यच आहे. सध्याच्या नाजूक स्थितीत धार्मिक संस्थांनी जाती धर्म भेद वगैरे न बाळगता मानवतेची सेवा म्हणून निधी दान करण्यासाठी पुढे यावे, अशी विनंती त्यांनी केली. लॉकडाऊनच्या काळात उत्पादन चालू ठेवून देशाला व बाहेरील देशांना आधार ठरलेल्या गोव्यातील औषध निर्मिती कंपन्यांचे त्यांनी आभार मानले.
कोरोनामुळे जगात महायुद्धापेक्षा वाईट स्थिती निर्माण झालेली आहे. साऱया जगाला या परिस्थितीवर मात करावी लागत आहे. गोव्याला आणि भारताला कठीण परिस्थितीतून जावे लागत आहे. मात्र, देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन आर्थिक योजनांमुळे पुन्हा उभारी येईल असा विश्वास व्यक्त केला.









